पुण्याला पुरेसे पाणी : उन्हाळी सिंचनासाठीही एक आवर्तन देणार | पुढारी

पुण्याला पुरेसे पाणी : उन्हाळी सिंचनासाठीही एक आवर्तन देणार

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा तीन अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा कमी आहे.
तरीदेखील जलसंपदा विभागाच्या काटेकोर नियोजनामुळे पुणे शहराला पुरेसा पाणीपुरवठा करूनही ग्रामीण भागातील शेतीच्या सिंचनासाठी उन्हाळ्यात एक आवर्तन देता येणार आहे.

खडकवासला धरणसाखळीतील आजअखेर गुरुवारी (दि. 8 फेब्रुवारी) 17.16 टीएमसी (58.85 टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी आठ फेब्रुवारीला 20.14 टीएमसी (69.06 टक्के) पाणीसाठा होता. पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा अधिक दिवस पाणी देण्यात आले. त्याचवेळी जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याचा वेग नियंत्रित ठेवत पाण्याचा वापर काटकसरीने करण्यावर भर दिला.

शेतीच्या सिंचनासाठीचे रब्बी हंगामातील आवर्तन यंदा 27 नोव्हेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 असे 65 दिवस सुरू होते. त्यामध्ये 5.37 टीएमसी पाणी देण्यात आले. जानाई शिरसाई योजनेंतर्गत तेथील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत त्यांना दीड टीएमसी पाणी पुरविण्यात आले. गतवर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्याने खरीप हंगामात 24 जुलै ते 11 ऑक्टोबर असे 79 दिवस एकूण 6.67 टीएमसी पाणी सिंचनासाठी दिले. पावसाळा संपल्यानंतर 15 ऑक्टोबरचा साठा लक्षात घेऊन पुढील वर्षाचे पाणीवाटपाचे नियोजन केले जाते.

गेल्या वर्षी 15 ऑक्टोबरला धरणसाखळीत 27.73 टीएमसी (95.13 टक्के) पाणी होते. 2022 मध्ये 15 ऑक्टोबरला 29.09 टीएमसी (99.77 टक्के) होते. हा फरक 1.36 टीएमसी एवढा होता. तो आज 2.98 टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. मुख्यत्वे रब्बी हंगामातील पाणी वापरामुळे धरणाच्या पाणीसाठ्यातील फरक वाढला. पुणे शहराला रोज 1600 दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी पुरविले जाते. खडकवासला प्रकल्पातून दरमहा दीड टीएमसी पाणी पुणेकरांना पिण्यासाठी दिले जाते. पुणे शहराला सध्याच्या दैनंदिन वापराप्रमाणे यंदा 31 जुलैपर्यंतचा म्हणजे सुमारे पावणेदोनशे दिवसांसाठी दहा टीएमसी पाणी लागणार आहे.

बाष्पीभवनामुळे दीड टीएमसी पाणी कमी होणार

उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे धरणसाठ्यातील सुमारे दीड टीएमसी पाणी कमी होईल. पुणे शहराला तसेच ग्रामीण भागाला लागणारे पिण्याचे पाणी, बाष्पीभवन यांसाठी सुमारे साडेअकरा टीएमसी पाणी लागेल. सध्याचा पाणीसाठा विचारात घेतल्यास, सिंचनाच्या उन्हाळी आवर्तनासाठी सुमारे पाच ते साडेपाच टीएमसी पाणी उपलब्ध होईल. त्याचबरोबर मुंढवा जॅकवेल योजनेतून रब्बी हंगामात 0.58 टीएमसी पाणी मिळाले. पुढील तीन महिन्यांत याद्वारे पाऊण ते एक टीएमसी पाणी मिळू शकेल. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात शेतीसिंचनासाठी दोनऐवजी एकच आवर्तन देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.

हेही वाचा

Back to top button