गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात आणखी एक जण ठार: १३ दिवसांतील तिसरी घटना

file photo
file photo

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: आलापल्ली वनविभागात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून आज मार्कंडा- कंसोबा वनपरिक्षेत्रातील जंगलात बापूजी नानाजी आत्राम (वय ४५, रा. लोहारा, ता. मुलचेरा) यास वाघाने ठार केले. रेंगेवाही उपक्षेत्रातील खंड क्रमांक २९३ मधील जंगलात बापूजीचा मृतदेह डोके खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला. मागील १३ दिवसांतील ही तिसरी घटना आहे.

७ जानेवारीरोजी चिंतलपेठ येथील सुषमा देवदास मंडल आणि १५ जानेवारीरोजी कोडसापूर येथील रमाबाई मुंजमकर या दोन महिलांचा वाघिणीने बळी घेतला होता.

त्यानंतर १८ जानेवारीरोजी रात्रीच्या सुमारास वाघिणीला जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र, वाघिणीला जेरबंद केलेल्या त्याच परिसरात जवळपास २०० मीटर अंतरावर पुन्हा एक मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

बापूजी नानाजी आत्राम हा बेपत्ता असल्याने गावकऱ्यांनी शोधमोहीम राबविली असता त्याचा मृतदेह खंड क्रमांक २९३ मध्ये आढळून आला. विशेष म्हणजे शरीरापासून डोके गायब असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने वाघिणीला जेरबंद करण्यापूर्वी तिने हल्ला करून ठार केले असावे, असा अंदाज वनाधिका-यांनी व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाची चमू घटनास्थळाकडे रवाना झाली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news