नागपूर, पुढारी वृत्तसेवा : तीन वर्षांपुर्वी मारहाणीत मनोरुग्णाचा मृत्यू झाल्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह हवालदारा विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ माजली आहे. सप्टेंबर २०१९ मधील हे प्रकरण आहे. एका मनोरूग्णाला बांधून केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झालेल्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात आली. त्या नंतर सक्करदरा पोलिस ठाण्यात गुरूवारी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अजित पांडुरंग सिद तसेच हवालदार कैलास दामोदर सह अन्य कर्मचाऱ्यांविरूद्ध मेंटल हेल्थ केअर अॅक्ट २०१७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीआयडी चौकशीत दोषी आढळून आल्यानंतर सीआयडी पोलिस अधीक्षक सुरेंद्र धुमाळे यांच्या तक्रारी नंतर सिद आणि दोमादरसह मेहरास सर्फुद्दीन शेख, युसुफ हसन खान, अनवर हुसैन जिगरी भाई तसेच दर्ग्यात राहणाऱ्या एका अज्ञाता विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उत्तरला येथील जैलया गजपूर निवासी फैजान अहमद नसीब अली (वय ३६) याचा मारहाणीत मृत्यू झाला होता. फैजान अहमद नसीब अली मनोरूग्ण असतानाही उपरोक्त आरोपींनी त्याचे हातपाय दोरीने बांधून त्याला मारहाण केली. मारहाणीत जखमी झाल्यानंतरही त्याला उपचारार्थ दाखल केले नाही. शेवटी जखमी फैजानचा मृत्यू झाला. त्यावेळी हे प्रकरण खूप गाजले होते.