

Elephant Sighting Sindewahi Villagers Fear
चंद्रपूर : ओडिसा वरून छत्तीसगड मार्गे गडचिरोलीत दाखल झालेले हत्ती पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव गन्ना, कुकडहेटी परिसरात आज (दि. ३०) सकाळी आढळून आले. तब्बल दीड वर्षानंतर पुन्हा हत्तींचा या परिसरात धुमाकूळ दिसून येत आहे.
ओडिसावरून छत्तीसगड मार्गे गडचिरोलीत दाखल झालेले हत्ती पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रात बुधवारी आढळून आले. रात्रीचा सुमारास वैनगंगा नदी ओलांडून सावली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या गेवरा, डोंगरगाव, निफंद्रा, मेहा या गावातून जंगलाचा मार्गे काल गुरुवारी रात्रीच्या सुमारास सिंदेवाही वनपरिक्षेत्र परिसरात प्रवेश केला.
गुंजेवाही जंगल मार्गे सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव गन्ना , कुकडहेटी गाव परिसरातून आज सकाळच्या सुमारास दाखल झाले. हत्तींचे आगमन झाल्याने या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. कळमगाव गन्ना, कुकडहेटी गावातून रानटी हत्तींचे आगमन झाल्याने काही काळ कुतूहल वाटले. परंतु हत्तीने नागरिकांचा पाठलाग केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंदेवाही तालुक्यात आज सकाळच्या सुमारास दोन रानटी हत्ती नागरिकांना पाहायला मिळाले. सिंदेवाही तालुका हा जंगलव्याप्त असल्याने अगोदरच वन्य हिंस्त्र प्राण्याची दहशत असताना आता त्यात हत्तींची भर पडत आहे. त्यामुळे मानव व वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. एकीकडे हिस्त्र जंगली प्राण्यांमुळे शेतकरी, शेतमजूर, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता रानटी हत्तीच्या एन्ट्रीने भीती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
रानटी हत्ती आज सकाळ साडेपाच वाजताच्या सुमारास कळमगाव गन्ना, कुकडहेटी मार्गे शिवणी वनपरिक्षेत्रांतील कुकडहेटी बिटातील जंगलात प्रवेश केला असल्याची माहिती वन विभागाने दिली. शिवणी वनविभागाची चम्मू हत्तीवर बारीक नजर ठेवून आहे. सिंदेवाही तालुक्यातील गाव परिसरात वाघाच्या दहशतीने अगोदरच दहशत असताना आता हत्तींनी भर पडली आहे.