Chandrapur Rain News | चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर सुरूच; धान पीक उद्ध्वस्त
चंद्रपूर : सोमवारी अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मंगळवारी पुन्हा पावसाचा जोर पाहायला मिळाला. मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात ठीक ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतात कापलेले धान पीक सावरता न आल्याने मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्यानंतर खरिप हंगाम तोंडावर आला आहे. परंतु खरीप हंगाम कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर कायम असून, नागभीड, सिंदेवाही, चिमूर, ब्रह्मपुरी, मुल, सावली या तालुक्यांमध्ये उन्हाळी धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शेतात उभ्या असलेल्या पिकांवर गारपिटीसह आलेल्या पावसामुळे आधीच शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची झाली होती. त्यातच आता कापणी झालेल्या धानालाही सावरता न आल्यामुळे बांधावर ठेवलेल्या कळप्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी हार्वेस्टरने कापलेले धान देखील वेळेवर वळवता न आल्यामुळे सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे.
अवकाळी पावसाचा फटका बसूनही अद्याप अधिकृत पंचनामे करण्यात आलेले नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधींची याबाबत उदासीनता दिसून येत आहे. उन्हाळी धान लागवडीसाठी मोठा खर्च करून देखील शेतकऱ्यांच्या हातात यंदा काहीही येण्याची शक्यता नाही, अशी भीती निर्माण झाली आहे.
अवकाळी पावसाचा फटका; खरीप हंगाम धोक्यात
खरीप हंगाम सुरू होण्यास काही दिवस उरलेले असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. उन्हाळी धानपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. उन्हाळी धान धानपिकाच्या लागवडीत मोठा खर्च करूनही हातात काहीच न आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते, कीटक नाशके व शेती हंगामाच्या तयारीसाठी निधी उरलेला नाही. त्यामुळे खरीप हंगाम कसा करायचा, हा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. शासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करून खरीप हंगामासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

