

Chandrapur Gadchiroli Highway Accident
चंद्रपूर : हिरापूर टोल नाक्याजवळ आज (दि.२४) दुपारच्या सुमारास भीषण अपघात घडला.यात ब्रम्हपुरी मतदार संघातील अनेकांचा समावेश असल्याची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता घडलेल्या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांच्या वेदना समजून घेण्यासाठी विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार स्वतः गोंदिया येथून पुढील सर्व दौरा कार्यक्रम स्थगित करून गडचिरोली रुग्णालयात दाखल झाले. उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या खाटेजवळ उभे राहून त्यांनी प्रत्येकाची आस्थेने चौकशी केली, शब्दांनी धीर दिला आणि डोळ्यांतूनच मायेचा आधार दिला.
आज घडलेल्या या भीषण अपघातात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील अनेक ग्रामीण खेड्यातील नागरिकांचा प्रवासी म्हणून सहभाग आहे. आपले निकटवर्तीय कार्यकर्ते, मतदार तथा इतर सर्व सामान्य जखमी रुग्णांची अवस्था पाहून आ. वडेट्टीवार भावूक झाले.
डॉक्टरांकडून उपचारांची सविस्तर माहिती घेत “एका क्षणाचाही विलंब न होता सर्वोत्तम उपचार मिळालेच पाहिजेत” अशा ठाम सूचना त्यांनी दिल्या. कुणालाही आर्थिक, प्रशासकीय किंवा वैद्यकीय अडचण भासू नये, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आश्वासन दिले. तसेच अपघातात काही गंभीर जखमी रुग्णांना नागपूर येथील मेडिकल कॉलेज तथा एम्स रुग्णालयात पुढील उपचाराकरिता तात्काळ पाठवण्याची सुविधा विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपलब्ध करून दिली.
अपघातामुळे हादरलेल्या कुटुंबीयांच्या अश्रूंना पुसत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. “तुम्ही एकटे नाहीत, मी तुमच्यासोबत आहे,” हे शब्द नातेवाईकांसाठी मोठा आधार ठरले. लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीपुरते नव्हे, तर संकटाच्या काळातही जनतेसोबत उभा असतो, याचे जिवंत उदाहरण या भेटीतून दिसून आले.
या संवेदनशील भेटीमुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात दिलासा निर्माण झाला. दुःखाच्या क्षणी माणुसकी जपणारा नेता म्हणून आ. विजय वडेट्टीवार यांची असलेली सर्व दूर ओळख आज अनेकांना प्रत्यक्ष अनुभवयास मिळाली.