

Chandrapur Congress Corporators offer
नागपूर : भाजपने पदासोबतच प्रत्येकी 1 कोटी रुपये अशी ऑफर नगरसेवकांना दिली आहे. दोन्ही बाजूने संख्याबळासाठी प्रयत्न सुरू आहेत. उबाठा, वंचित आणि दोन अपक्ष अशी जुळवाजुळव सुरू आहे. मात्र हायकमांडचा आदेश मी पाळणार आहे. मी सच्चा काँग्रेस कार्यकर्ता आहे. शेवटी भाजपने कितीही दावा केला तरी महापौर काँग्रेसचाच होईल, असा दावा काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी (दि.२४) केला.
वडेट्टीवार आणि खासदार धानोरकर यांची आणि संबंधितांची प्रभारी रमेश चेन्निथला, सह प्रभारी कुणाल चौधरी, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या सर्वांसोबत झूम मीटिंग पार पडली. यावेळी ते बोलते होते.
ते पुढे म्हणाले की, माझ्यासाठी कुठलेही पद, सत्ता महत्वाची नाही तर काँग्रेस पक्ष महत्वाचा आहे. त्यांनी पुढे केलेल्या गट नेत्याबाबत आमचे एकमत नव्हते. आमचे काँग्रेसचे 27 आणि पप्पू देशमुख यांच्यासोबतच 3 असे 30 सदस्यांचे संख्याबळ असले तरी आणखी 4 सदस्य लागणार आहेत. ते आपल्याकडे आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यासंदर्भात बहुमतासाठी लागणाऱ्या 4 सदस्यांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी घेतली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच स्थायी समिती माझ्या गटाला मिळणार असून महापौर पदासाठी खासदार धानोरकर यांचा अट्टाहास असल्याचा आरोप त्यांनी केला. शुक्रवारी कार्यालयीन वेळ संपल्यावर नागपुरात विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन गट नोंदणी केली यावर कुणाचा तरी फोन आला होता, असा आरोप केला जात असला तरी आपल्याकडे पुरावा नसल्याने आपण याबाबतीत काही बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,मंत्री छगन भुजबळ यांना क्लिनचीट प्रकरणी छेडले असता भाजपकडे मोठे वॉशिंग मशीन असल्याने याबाबत आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही असे उत्तर दिले. याच प्रकरणी त्यांना कारागृहात जाण्याची वेळ आली त्याची भरपाई कशी होणार असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.