

Chandrapur Municipal Corporation
चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेमधील वादावर अखेरीस पडदा पडला असून तिथे महापौर कोण होणार याबाबतचा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार असल्याचे, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. चंद्रपुरात पाच वर्ष काँग्रेसचा महापौर असणार,सगळ्यांचे समाधान होईल असा निर्णय काँग्रेस घेणार अस सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाला पूर्णविराम दिला.
चंद्रपूर महापालिकेबाबत काँग्रेस पक्षात वाद निर्माण झाल्याने चंद्रपुरात काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. भाजपचे कोणतेही नेते कितीही ओरडले तरी चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर होणार अस,काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी आज ठासून सांगितले. नेत्यांमध्ये गैरसमज होत असतात पण कार्यकर्ता हा महत्वाचा असल्याने त्यांना समाधान वाटेल असा निर्णय घेण्यात येईल, असं वडेट्टीवार यांनी स्पष्टं केले.चंद्रपुरात महापौर बसविण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ जमले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांशी चर्चा झाली आहे. शिवसेना हा पक्ष काँग्रेस बरोबर सत्तेत असेल असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
मुंबईतील मनसे नेत्यांनी चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेस एकत्र असल्याचे तारे तोडले याचा समाचार घेताना वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेस एकत्र आहे हे दिव्य स्वप्न मनसे नेत्यांना कुठून पडले? लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचे काम मनसेने करू नये. मनसे भाजपची बी टीम आहे अशी टीका काँग्रेसने केली तर चालेल का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
महाराष्ट्रात भाजप आणि MIM हे पक्ष एकत्र आहेत, ते रात्री एकत्र जेवतात दिवसा भांडतात.काँग्रेस पक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे.त्यांना रसद कोण पुरवते,ताकद कोण देते हे महाराष्ट्रातील जनतेला कळेल अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.