

चंद्रपूर : चिमूर येथील प्रगती नगर भागात घडलेल्या मोठ्या घरफोडीचा गुन्हा चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांत उघडकीस आणला. याप्रकरणी दोघा सराईतांना अटक करण्यात आली. सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे (रा. गौतम नगर, भद्रावती) आणि गोपाल उर्फ बडा कोब्रा जीवन मालकर (वय २५, रा. श्याम नगर, चंद्रपूर) अशी अटक करण्यात आलेल्या सराईतांची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल ३८ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले.
चिमूर पोलीस ठाणे हद्दीतील प्रगतीनगर येथे कल्पना मुर्लीधर गोननाडे (वय ४६, रा. प्रगती नगर) ह्या राहतात. त्या ६ जुलै रोजी गावी गेल्या होत्या. यादरम्यान दिवसा बंद घर फोडून चोरट्यांनी ३८ तोळे सोने चोरून नेले होते. ११ जुलै रोजी त्या घरी परतल्यानंतर ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनतर त्यांनी चिमूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. घरातून सोन्याच्या चपळाकंटी, पोत, बांगड्या, गोप, कानातले, अंगठ्या, नथ, गरसुळी असे मिळून ८ लाख ४९ हजार २०० रुपयांचे ३८ तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथके तयार करण्यात आले. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे आणि गोपाल उर्फ बडा कोब्रा जीवन मालकर यांना संशयितरित्या ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले ३८ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून आरोपींची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक कॉक्रेडवार, बलराम झाडोकार, विनोद भुरले, संतोष निभोरकर, सर्वेश बेलसरे, सुनिल गौरकार यांनी केली. तसेच चंद्रपूरच्या सायबर पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली.