

जयसिंगपूर : येथील पाचव्या गल्लीतील राधाबाई रोडवर असलेले बियाणी यांचे घर फोडून चोरट्यांनी हिरे व सोन्याचे दागिने असा सुमारे 40 लाख 70 हजारांचा ऐवज लंपास केला. गुरुवारी भरदिवसा ही घटना घडली असून, रविवारी हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी एका महिलेसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने जयसिंगपुरात खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहिती अशी, श्री भगवान राजाराम बियाणी व कुटुंबीय कामानिमित्त गुरुवारी (दि. 22) बाहेर गेले होते. सकाळी 10 ते दुपारी 3 च्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाट उचकटून त्यातील 2 लाखांचे डायमंड ब—ेसलेट, 7 लाख 20 हजारांचा 80 ग्रॅमचा नवरत्न हार, 13 लाख 50 हजारचा 150 ग्रॅमचा सोन्याचा कमरपट्टा, 4 लाख 50 हजारचे 50 ग्रॅमचे नवरत्नाचे दोन झुमके, 3 लाख 15 हजारची 35 ग्रॅम सोन्याची वेल व झुमके, चार लाख 5 हजार रुपयांची 45 ग्रॅमची सोन्याची बोर बिंदी दोन असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. घरी परतल्यानंतर बियाणी कुटुंबाला हा चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी रविवारी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. मात्र, या भरदिवसा घडलेल्या घटनेने जयसिंगपुरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे या चोरीचा छडा लावणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.