

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत १३ वर्षांनी झालेल्या मतदारसंघातील मतदान प्रक्रियेनंतर निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये २१ पैकी १३ संचालक बिनविरोध निवडले गेले. उर्वरित ७ जागांसाठी चुरशीची निवडणूक झाली. निकालानंतर कॉंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी बहुमत असल्याचा दावा केला असून अध्यक्षपदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेने १४ संख्याबळ तर भाजपने ११ संख्याबळ असल्याचा दावा केला आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत १३ संचालक बिनविरोध निवडले गेले. उर्वरित ७ जागांसाठी शुक्रवारी (दि.११) चांदा इंडस्ट्रियल सोसायटीत सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीनंतर अनेक धक्कादायक आणि चुरशीचे निकाल समोर आले. चंद्रपूर तालुका अ गटात काँग्रेसचे दिनेश चोखारे यांनी अवघ्या एका मताने सुभाष रघाताटे यांचा पराभव केला. चोखारे यांना १५, तर रघाताटे यांना १४ मते मिळाली. कालच्या मतदानादरम्यान या दोघांच्या समर्थकांत वाद निर्माण झाला होता. वरोरा तालुका अ गटात जयंत टेमुर्डे यांनी विद्यमान संचालक डॉ. विजय देवतळे यांचा पराभव केला. सिंदेवाही अ गटात निशिकांत बोरकर यांनी प्रकाश बन्सोड यांचा पराभव करून विजय मिळविला.
राजुरा अ गटात भाजपचे माजी आमदार सुदर्शन निमकर आणि नागेश्वर ठेंगणे यांच्यात झालेली लढत अत्यंत अटीतटीची ठरली. दोघांनाही १२-१२ मते मिळाल्याने निकाल 'ईश्वर चिठ्ठी'द्वारे ठरवण्यात आला. यात निमकर विजयी ठरले. सावली ब गट दोनमध्ये रोहित बोम्मावार यांनी विक्रमी २१३ मते मिळवत विजय मिळविला. त्यांच्या प्रतिस्पर्धी किशोर ढुमणे यांना ६७, तर उमाकांत धांडे यांना केवळ ९ मते मिळाली. एससी गटात ललित मोटघरे यांनी ५३२ मतांसह बाजी मारली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी बांबोळे यांना तुलनेत कमी मते मिळाली. एसटी-व्हीजेएनटी गटात यशवंत दिघोरे यांनी विद्यमान संचालक दामोदर रुयारकर यांचा ३७२ विरुद्ध २६६ अशा मतांनी पराभव केला.
या निवडणुकीत आधीच १३ संचालक बिनविरोध निवडले गेले होते. यामध्ये रवींद्र शिंदे, संतोष रावत, संदीप गड्डमवार, डॉ. अनिल वाढई, संजय डोंगरे, विलास मोगरकर, उल्हास करपे, गणेश तर्वेकर, दामोदर मिसार, खासदार प्रतिभा धानोरकर, नंदा अल्लूरवार, विजय बावणे आणि आवेश खान पठाण यांचा समावेश आहे. कॉंग्रेस आणि भाजप दोघांनीही बँकेत बहुमत असल्याचा दावा करत अध्यक्षपदासाठी अंतर्गत जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यामुळे अध्यक्ष कोण होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.