

चंद्रपूरः महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., उप प्रादेशिक कार्यालय चिमुर यांच्यावतीने आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत धान खरेदीस 20जुलै असून त्यांना शासकिय खरेदी केंद्रावर धान विकता येणार आहे.
आधारभूत किंमत खरेदी योजना रब्बी पणन हंगाम 2024-25 अंतर्गत शेतकऱ्यांकडून 30 जून पर्यंत धान खरेदी करण्यात आली होती. परंतु खरेदीची मुदत संपल्याने सरकारी केंद्रावरील खरेदी बंद करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांकडे धान पडून असल्याने विकण्याची चिंता निर्माण झाली होती. मुदतवाढ मिळणार की नाही याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. अखेर शासनाने धान खरेदी करण्यास मुदतवाढ दिली आहे. या संदर्भातील शासन आदेश क्रमांक खरेदी 1125/प्र.क्र. 19/नापु 29 दिनांक 07 जुलै 2025 नुसार, धान खरेदीची अंतिम मुदत आता 20 जुलै 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
या निर्णयामुळे उन्हाळी हंगामात धानाची नोंदणी केलेल्या आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. उप प्रादेशिक कार्यालय चिमूरमार्फत सर्व आदिवासी विविध कार्यकारी संस्थांना निर्देश देण्यात आले असून, त्यांनी मुदतवाढीच्या कालावधीत म्हणजेच 20 जुलै 2025 पर्यंत नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून धान खरेदीची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असलेला धान सरकारी केंद्रावर विकता येणार आहे, अशी माहिती चिमुर येथील उप प्रादेशीक व्यवस्थापक श्री राठोड यांनी दिली आहे.