चंद्रपूर : मजरा नाल्यातील पुराच्या पाण्यातून बैलजोडी वाहून जात असताना त्यांना वाचविण्यासाठी बाप-लेक सरसावले. बैलाने ओढत नेल्याने मुलगा पुराच्या पाण्यातून वाहून गेला. तर वडिलांचा जीव वाचला आहे. दोन्ही बैलांचा मृत्यू झाला असून पोलिसांसह बचाव पथकाकडून या मुलाचा शोध सुरू आहे. ही दुर्दैवी घटना चिमूर तालुक्यातील भांसुली-खडसंगी मार्गावर बुधवारी (दि.७) सायकांळी चारच्या सुमारास घडली. समीर वामन राणे (१९) असे त्या मुलाचे नाव आहे.
चिमूर तालुक्यातील मजरा बेगडे येथील वामन राणे व मुलगा समीर राणे हे दोघे बुधवारी सकाळी शेतावर गेले होते. परिसरात बुधवारी मुसळधार पाऊस झाल्याने या परिसरातील ओढे- नाले तुडूंब भरून वाहत आहेत. सायंकाळी जवळपास चारच्या सुमारास वडील व मुलगा दोघेही बैलजोडी घेवून घराकडे येत होते. रस्त्यावरील बंधाऱ्याजवळील नाल्यातून दोन्ही बैल जात असताना बैलांना बांधून असलेले कासरे सोडवण्यासाठी बाप-लेक नाल्याजवळ गेले. त्यावेळीं एक बैल नाल्यात उतरला तर दुसरा बैल बाहेर नाल्याबाहेर होता. दोघांना बांधून असलेले कासरे सोडवत असताना अचानक समीर नाल्यात पडला.
त्याला बैलाने ओढल्याने तो वाहून गेला. तर वडील वामन राणे हे नाल्याच्या पुराच्या पाण्यातून कसे-बसे बाहेर पडले. मुलगा समीर मात्र बैलजोडीसह वाहून गेल्याने त्याच्यासह बैलांचा शोध सुरू होता. घटनास्थळावरून जवळपास २ किमी अंतरावर बैलजोडी आढळून आली. पण दोन्ही बैलजोडीचा मृत्यू झाला होता. समीरचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध लागलेला नव्हता. याबाबत माहिती चिमूर पोलीस स्टेशनला देण्यात आली. चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.