नागपूर : पुढारी वृत्तसेवा
नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील झुल्लर गावातील श्री जी ब्लॉक कंपनीत आज (मंगळवार) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून, यामध्ये ८ ते ९ कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. मृतकाचे नाव नंदकिशोर करंडे झुल्लर असे आहे. व्यवस्थापन आणि संतप्त नातेवाईक यांच्यातील चर्चेनंतर 30 लाख रुपये मृत नंदकिशोर यांच्या कुटुंबियांना देण्याचे मान्य करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यातील 10 लाखांचे धनादेश पत्नी आणि मुलगा प्रत्येकी ५ लाख असे आज देण्यात आल्याची माहिती आहे.
मंगळवारी मौदा तालुक्यातील झुल्लर येथील श्रीजी ब्लॉक कंपनीमध्ये झालेल्या भयंकर बॉयलर ब्लास्टमध्ये नंदकिशोर करंडे यांचा मृत्यू झाला. तर राजेंद्र किसनजी उमप (झुल्लर), हुसेन बाशीर सय्यद (वडोदा), स्वप्निल नारायण सोनकर (वडोदा), कल्लू उमेदा शाहू (वडोदा), कुवरलाल गुणाजी भगत (वडोदा), वंश विष्णुजी वानखेडे(झुल्लर), गुणवंत दौलतराव गजभिये (वडोदा), रामकृष्ण मनोहर विभुते (वडोदा), ब्रह्मानंद रामाजी मानेगुडधे (राणमांगली) हे कामगार गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या भयंकर घटनेत तीन बकऱ्या देखील मृत झाल्या आणि आजूबाजूच्या शेतातील सहा घरांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.