

High Court on Chhota Matka Treatment
चंद्रपूर : ताडोबातील अधिवास आणि नयनतारा वाघिणीवरील हक्कावरून बुध्द पौर्णिमेच्या (12 मे) च्या रात्री ब्रम्हा वाघासोबत झालेल्या जोरदार लढाईत ताडोबाचा राजा छोटा मटकाने त्याचा खात्मा केला, परंतु तो गंभीर जखमी झाला. तेव्हापासूनच ताडोबा व्यवस्थापनाचे वतीने जंगलातच त्याचेवर नैसर्गिक उपचार सुरू आहेत. परंतु पाऊणे चार महिण्याचा कालावधी होऊनही छोटा मटाकची प्रकृती अद्यापही ठणठणीत झाली नाही. सोशल मीडिया आणि माध्यमांनी वारंवार त्याच्याप्रकृती विषयी चिंता व्यकत केली.
त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने छोटा मटकाच्या प्रकृतीची दखल घेतली आहे. त्याच्या प्रकृतीवर हायकोटाची वॉच राहणार आहे. तर दुसरी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे संचालक प्रभुनाथ शुक्ला यांनी छोटा मटकाची प्रकृती ठीक आहे आणि त्याच्यावर वैद्यकिय अधिकाऱ्यासह वनाधिकाऱ्यांच्या पथकाची देखरेख असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
बुध्द पौर्णिमेच्या रात्री ताडोबाच्या रामदेगी क्षेत्रात ब्रम्हा वाघासोबत छोटा मटकाची जोरदार लढाई झाली. दोन्ही वाघ एकमेका विरोधात भिडले. या भीषण लढाईत अखेर छोटा मटकाने ब्रम्हा वाघाचा खात्मा केला. मात्र यामध्ये छोटा मटका गंभीर जखमी झाला. लढाईनंतर बाहेर आलेल्या छोटा मटकाच्या तोंडातून रक्त बाहेर पडत होते. पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला नीट चालता येत नव्हते.
वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेत. ब्रम्हाचा मृतदेह ताब्यात घेऊन जखमी छोटा मटकाच्या उपचारासाठी वैद्यकिय अधिकाऱ्यासह, वनाधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक तैनात केले. तेव्हा पासून छोटा मटकावर नैसर्गिक उपचार सुरू आहे. परंतु अद्यापही छोटा मटका ठणठणीत झालेला नाही. सोशल मिडीयावर पर्चावरण प्रेमी तथा वन्यजीव प्रेमींनी ताडोबा किंग छोटा मटकाच्या आरोग्याविषयी गंभीर चिंताव्यक्त करीत व्हिडीओ शेअर केले. छोटा मटकाच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होत असल्याने ताडोबा प्रशासनाच्या कार्यप्रणीलीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करून छोटा मटकाला वाचविण्याकरीता साकडेही घातले.
सोशल मीडिया आणि माध्यमांनी आणि वन्यजीव पर्यावरण प्रेमींनी छोटा मटकाच्या जीव वाचविण्याविषयी चिंता व्यक्त केल्यानंर मुंबई हायकोटाच्या नागपूर खंडपीठाने छोटा मटकाच्या तब्येतीची काळजी करीत दखल घेतली आहे. नागपूर खंडपीठात स्वत: जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणात काल सोमवारी न्यायमूर्ती अनिल किलोर व अजित कडेठाणकर यांच्या समक्ष सुनावणी पार पडली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचे कामकाज पहाण्यासाठी ॲड. यश सांबरे यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना एका आठवड्यात छोटा मटका विषयी नियमानुसार जनहित याचिका तयार करण्यास सांगितले आहे, त्यामुळे आता मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपिठाची छोटा मटका च्या प्रकृतीवर वॉच राहणार आहे. याकडे ताडोबा प्रशासनाला दुर्लक्ष करून चालता येणार नाही.
दरम्यान सोशल मीडिया व विविध माध्यमांमध्ये जखमी छोटा मटका वाघाविषयी प्रकाशीत होत असलेल्या माहिती विषयी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे संचालक श्री प्रभुनाथ शुक्ला यांनी पुढारीशी बोलताना छोटा मटका विषयी ताजी अपडेट दिली आहे. छोटा मटकावर नैसर्गीक उपचार प्रणालीद्वारे उपाय केल्या जात आहे. तो सध्या ठीक आहे. आवश्यक त्या वेळी त्याला डॉट मारून उपचार देखील करण्यात आले आहे, परंतु सध्या ज्याची प्रकृती चांगली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वैद्यकिय अधिकारी आणि वनाधिकाऱ्यांचे पथक छोटा मटकाच्या प्रकृतीची देखरेख करण्यासाठी तैनात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
ताडोबातील "छोटा मटका" वाघ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एक प्रसिद्ध वाघ आहे. त्याचे नाव आणि प्रसिद्धी प्रामुख्याने त्याच्या वडिलांमुळे व स्वतःच्या वर्चस्वामुळे त्याला मिळाली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रामदेगी क्षेत्रात छोटा मटकाचे प्रस्थ आहे. "छोटा मटका" म्हणजेच "लहान मटका". तो प्रसिद्ध वाघ "मटका" चा मुलगा आहे, ज्यामुळे त्याला "छोटा मटका" असे टोपण नाव देण्यात आले. ताडोबातील एक प्रभावशाली नर वाघ म्हणून त्यांची ओळख आहे. तो एक सामर्थ्यवान, उत्साही आणि आक्रमक स्वभावाचा वाघ आहे, सध्या तोच ताडोबाचा राजा म्हणून ओळखल्या जातो.
छोटा मटका ताडोबामधील सफारी पर्यटनाचे एक विशेष आकर्षण आहे. त्याचे दर्शन अनेक वेळा पर्यटकांना झाले आहे. त्याची शौर्यपूर्ण भटकंती, पट्ट्यांचे विशिष्ट नमुने, रुंद कपाळ, आणि सशक्त शरीरयष्टीमुळे तो सहज ओळखला जातो. नयनताराचे त्याला आर्कषण आहे. नयनतारा ही वाघीण तिच्या निळ्या डोळ्यांनी पर्यटकांना घायाळ करते. त्यामुळे तिला बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. काही वर्षांपासून या क्षेत्रात छोटा मटकाचे वास्तव्य आहे. तसेच नयनताराचेही वास्तव्य आहे. छोटा मटका आला तेव्हापासून या क्षेत्रात इतर वाघांना छोटा मटकाने प्रवेशबंदी केली आहे. आणि त्यानंतरही प्रवेश केला तर त्यांचा छोटा मटका खात्मा केल्याशिवाय राहत नाही. यापूर्वी त्याचे क्षेत्रात रूद्रा, बली, मोगली, बजरंग यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना त्याने पिटाळून लावले. त्यानंतर आलेल्या बजरंग, मोगली आणि नुकत्याच ब्रम्हा वाघाचा त्याने खात्मा केला आहे.