

चंद्रपूर : शनिवारी सकाळी ताडोबाच्या बफर झोनमध्ये सिंदेवाही तालुक्यातील कुकडहेटी गावालगत प्रवेश केलेल्या दोन हत्तीवर ताडोबा प्रशासनाने निगराणी सुरू केली आहे. अजूनही दोन्ही हत्ती चंद्रपूर जिल्ह्यातच भ्रमंती करीत आहेत. नागरिकांना कोणताही धोका होऊ नये या करिता नागरिकांना जागृत केले जात आहे.
काल शुक्रवारी (३० मे) गडचिरोली जिल्ह्यातून दोन हत्ती उमा नदी पार करून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील कुकडहेटी गावात दाखल झाले. त्यानंतर ते कक्ष क्रमांक ८०८, २७०A आणि २७०B मार्गे जंगलाच्या दिशेने रवाना झाले. काही वेळ त्यांनी नलेश्वर तलावाजवळ खेळण्याचा आनंद घेतला. ३० तारखेच्या रात्रीपर्यंत त्यांच्या पायांचे ठसे कंपार्टमेंट क्रमांक ३१९ मार्गे मुख्य गाभा क्षेत्राच्या दिशेने जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
वन विभागाकडून ईडीसी सदस्य व स्थानिक ग्रामस्थांना सतर्कतेबाबत जागरूक केले जात आहे. पीआरटी आणि ईडीसी टीम्स या कामात सहभागी करण्यात आल्या आहेत. गावकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा तसेच जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला जात आहे. जंगलात एकटे फिरणे टाळणे, रात्री घराबाहेर झोपू नये, या करीता आवाहन करण्यात येत आहे.
वनपरिक्षेत्रांतील कर्मचारी, बचाव पथक व एसटीपीएफचे कर्मचारी हत्तींच्या हालचालींचा मागोवा घेत आहेत. या टीम्सना रात्री पाहता येणारी उपकरणे (नाईट व्हिजन), IR ड्रोन आणि हत्ती हुसकावण्यासाठी आवश्यक साहित्य पुरवले आहे. हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना उंच ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. हत्तीबाबत कुठल्याही प्रकारची माहिती असल्यास तात्काळ नजीकच्या वन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन ताडोबा प्रशासनाने केले आहे.