

World Tiger Day Special Tadoba near Chandrapur became the 'home' of the Tiger
उदय नागरगोजे
बीड : जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या वाघाला वाचविण्यासाठी ’वाघाची’ कामगिरी करण्याचे काम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वनविभागाच्या टीमने केली. या क्षेत्रात वर्षानुवर्षे काम करणारे, जंगल आणि वन्यजीवांप्रती तळमळ असणारे अधिकारी लाभल्यानेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आता वाघोबाचे सुरक्षित घर बनला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यासाठी या भागातील तीन गावांचे पुनर्वसन करण्याबरोबरच मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे या ठिकाणच्या मूळ रहिवाशांना रोजगारही उपलब्ध होऊ शकला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरण पूरक पर्यटन, वाघांच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजना, जंगल परिसरात असलेल्या गावातील तरुणांसाठी रोजगार, तत्काळ दिली जाणारी नुकसान भरपाई, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे या ठिकाणी वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 2010 मध्ये 15 वाघ होते तर आता 2024 मध्ये ही संख्या 95 वर पोहचली आहे. यातूनच या ठिकाणची यंत्रणा कशी तत्परतेने कार्यरत आहे, हे दिसून येते.
ताडोबा अंधारी कोअर एरियात यापूर्वी तीन गावे होती. या तीन गावांच्या परिसरात अनेकदा मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटना घडत होत्या तसेच विविध उपाययोजना करतांना वनविभागाला देखील अडचणी येत होत्या. या गावकर्यांच्या सहमतीने वनविभागाच्या पुढाकारातून तिन्ही गावांचे पुनर्वसन करण्यात आले. यामुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष बर्यापैकी कमी होऊ शकला. याबरोबरच वनविभागाकडून या वनक्षेत्रात कुरण विकास करण्यात आला. यामुळे तृणभक्षी प्राणी वाढले आणि पर्यायाने मांसभक्षी प्राण्यांच्या संख्येतही वाढ होत गेली.
वन्यप्राण्यांपासून मानवाचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविलेल्या आपण अनेकदा पाहतो. परंतु ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये मात्र वाघांसाठी स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स स्थापन करण्यात आला. या टीममधील सदस्यांना केवळ वाघ वाचवणे हाच टास्क देण्यात आला असून त्यासाठी ते अव्याहत कार्यरत असतात.