

Chandrapur News |
चंद्रपूर : नागभिड तालुक्यातील चिंधीचक, चिंधीमाल, तळोधी (बा.), उश्राळमेंढा परिसरात उन्हाळी धानपिकांचे हिरवंगार स्वप्न गारपिटीने उद्ध्वस्त झाले आहे. गारपिटीने जमीनदोस्त झालेलं धानपिक आता कापता येण्याजोगं राहिलेलं नाही. त्यामुळे उरल्यासुरल्या पिकांच्या कापणीवर खर्च करायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
नागभिड तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या गारपिटीच्या तडाख्यात सुमारे 2 हजार एकरापेक्षाही जास्त धानपिकांची नासाडी झाल्याचा अंदाज आहे. शनिवारी नागभिड तहसीलदारांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. कृषी विभाग व तलाठ्यांनी काही ठिकाणी जाऊन पहाणी केली. सोमवारपासून पुन्हा सर्वे करण्यात येणार आहे. परंतु उद्या सोमवारी शेतकरी नागभिड तहसील कार्यालयावर धडक देऊन नुकसानीची भीषणता तहसीलदारांना लक्षात आणून देत भरपाईची मागणी करणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील अर्धे अधिक नागभिड, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, मुल, सावली, गोंडपिपरी व पोंभुर्णा, चिमूर तालुक्यात धानाचे उत्पादन घेतले जाते. यावर्षीच्या खरीपात अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकांची लागवड करण्यावर भर दिला. जानेवारी फेब्रुवारी महिन्यात नागभिड तालुक्यातील चिंधीचक, चिंधीमाल, तळोधी (बा.) परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपिकाची लागवड केली. तलाव व स्वतःच्या सिंचनाचे साधन असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी बारीक व ठोकळ आणि लवकर झडणाऱ्या धानपिकांची लागवड करून त्यांची जोपासना केली. यावर मोठ्या प्रमाणात दुप्पटीने खर्च करण्यात आला. लागवडीला चार महिन्यांचा कालावधी पूर्ण आला होता. आठवडा, पंधरवाड्यात धानपिक घरात येईल अशी आशा होती. परंतु अचानक शेतकऱ्यांच्या उन्हाळी धानपिकाचे हिरवंगार स्वप्न गारपिटीने उद्ध्वस्त केले आहे.
गुरुवार रात्री आठ वाजताच्या सुमारास नागभिड तालुक्यातील चिंधीचक, चिंधीमाल, किटाळी बोर., मांगरूड, तळोधी (बा.) परिसरातील उश्राळमेंढा, गंगासागर हेटी, आकारपूर, सावर्ला, लखमापूर, खरकाडा, आलेवाही शेतशिवारात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. बोरांच्या आकाराच्या गारपिटीने उभे असलेले शेतकऱ्यांचे हिरवंगार स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे. उन्हाळी पिकांमध्ये हलक्या आणि मध्यम जातींची पिकं लागवड करण्यात आली होती. लागवड केलेली ठोकळ व बारीक जातींचं धानपिक गारपिटीने पूर्ण झडले आहे. बांध्यामध्ये धानाचा सडा पडलेला आहे. सुमारे 80 ते 90 टक्के धानपिकं जमीनदोस्त झाली आहेत.
तोंडाजवळ आलेला घास अस्मानी संकटाने हिरावल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू ढळत आहेत. गारपिटीने धानपिक धुळधाण झाली आहेत, लोळले आहेत. काही ठिकाणी तर भूईसपाट झाली आहेत. भूईसपाट झालेल्या पिकांकडे पाहून शेतकरी मदतीसाठी याचना करू लागले आहेत. दरवर्षी उन्हाळी धानपिकांची मळणी हार्वेस्टरद्वारे होते. पंधरवाड्यात हार्वेस्टर लावून धान मळणीला सुरुवात होणार होती. गारपिटीने जमीनदोस्त झालेलं धानपिक आता कापता येण्याजोगं राहिलेलं नाही. भूईसपाट झालेली 5 ते 10 टक्के असलेली पिकं हार्वेस्टरद्वारे मळणी करायची की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
हार्वेस्टरला येणारा खर्च जास्त, तर हातात येणारे उत्पन्न अत्यल्प असल्याने अनेक शेतकरी उरलेली सुरलेली उन्हाळी धानाची कापणी करण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी नागभिड तहसीलदारांनी गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे कृषी विभाग व महसूल विभागाला निर्देश दिले. कृषी सहायक व तलाठी यांनी काल शनिवारी नुकसानग्रस्त बांधावर जाऊन पाहणी केली. पाहणीत गारपिटीच्या नुकसानीची भीषणता दिसून आली. आज रविवार सुटीचा दिवस असल्याने सर्वे बंद आहे. उद्या सोमवारपासून परत सर्वे करण्यात येणार आहे. सुमारे 2 हजार एकरांपेक्षा नागभिड तालुक्यातील चिंधीचक, चिंधीमाल, किटाळी बोर., मांगरूड, तळोधी (बा.) परिसरातील उश्राळमेंढा, गंगासागर हेटी, आकारपूर, सावर्ला, लखमापूर, खरकाडा, आलेवाही शेतशिवारातील उन्हाळी धानपिकं नष्ट झाली आहेत. गारपिटीमुळे 80 ते 90 टक्के पिकंच भूईसपाट झाली आहेत. पाच ते दहा टक्केच पिकं आता शेतात दिसून येत आहेत. उरले सुरले पिकं कसं काढायचं याविषयी शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
गुरुवार रात्रीच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नागभिड तालुक्यातील उन्हाळी धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. खरीप हंगामातील धान निघाल्यानंतर ते विकून शेतकऱ्यांनी बँका, सोसायट्यांचे कर्ज चुकते केले आहे. खासगी कर्ज घेऊनच उन्हाळी धानपिकांची लागवड करण्यात आली आहे. परंतु अस्मानी संकटाने हातात येणारे उभं पिकंच भूईसपाट झाल्याने शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाने तात्काळ मदत करावी, याकरिता उद्या सोमवारी नुकसानग्रस्त शेतकरी नागभिड तहसील कार्यालयावर धडक देणार आहेत. गारपिटीने धानाची झालेली नुकसानीची भीषणता तहसीलदारांच्या लक्षात आणून देणार आहेत. त्यांच्यासोबत चर्चा करून तातडीने नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करणार आहेत.