

चंद्रपूर : भटाळी कोळसा खाणीमध्ये माती उत्खन्नाचे काम करीत असेल्या आंध्रपदेशातील कावेरी सी 5 जेवी या कंपनीमध्ये एका अल्पवयीन मुलाला पैसे घेऊन कामावर घेण्यात आले. त्यानंतर त्याला कामाचा मोबदला न देताच मारहाण करून कामावरून काढण्यात आले. या प्रकरणाची बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, सदर बालकावर कंपनीने अत्याचार केल्याचे निष्पन्न झाल्याने कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेंजरसह एचआर हेड विरोधात दुर्गापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
बालसंरक्षण अधिकारी शशिकांत मोकासे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, चंद्रपूर महानगरालगतच्या भटाळी कोळसा खाणीमध्ये माती उत्खननाचे काम आंध्रप्रदेशातील कावेरी सी 5 जेवी या कंपनीला मिळाले. कंपनीने बालकामगार कायद्याची अंमलबजावणी न करताच आर्यन श्याम जाऊलकर (वय 17) रा. समता नगर, नेरी, दुर्गापुर याला 12 डिसेंबर 2024 रोजी भटाळी येथील कावेरी प्रा. लि. कंपनी मध्ये माती व गोटे उत्खनाचे कामाकरीता कामावर ठेवून घेतले. तसेच त्याचेकडून एच आर हेड गिरी सिध्दापल्ली यांनी कामवर घेण्यासाठी 20 हजार रूपये घेतले. तसेच सदर अधिकाऱ्यांने याबाबत कुठल्याही अधिकाऱ्याला माहिती दिली नाही.
काही दिवसानंतर प्रोजेक्ट मॅनेजर व्यंकटेश रेड्डी रम्मना रेड्डी हे सुट्टीवरुन परत आले असता त्यांना बालकामगार कंपनीमध्ये कामावर असल्याचे लक्षात आले. त्यांनी आर्यन जाऊलकर याला 29 जानेवारी 2025 बोलवून शिवीगाळ व मारहाण केली. या घडलेल्या प्रकरणाबाबत कुठेही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर केलेल्या कामाचा मोबदला न देताच कामावरुन काढून टाकले.
कंपनीने बालकामगारावर अन्याय करून आई व त्याच्या सोबत चुकीची भाषा वापरली. तसेच ज्या ठिकाणी त्या बालकांला कामावर ठेवण्यात आले तो माईनिंगचा घातक परिसर आहे. बालकाच्या शरीरनामानुसार व बौध्दीकदृष्ट्या ते काम बालकामगाराकडून करणे शक्य नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदर प्रकरणाची बाल संरक्षण अधिकारी यांचेकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली.
कावेरी कंपनीमध्ये जावून बालसंरक्षण अधिकाऱ्यांच्या पथकाने चौकशी केली असता कंपनीमध्ये सिसिटिव्ही फुटेज नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर बालसंरक्षण अधिकाऱ्यांच्या पथकाने बालकाची सामाजिक तपासणी अहवाल व गृहचौकशी करीता बालकाच्या घरी भेट दिली. बालकाच्या घरची परिस्थीती हलाखीची आहे. अपघातामुळे आईच्या एका पायाने दुखापत झाली आहे. त्यामुळे तिला कुठलेही काम करता येत नाही. तर बालकाचे वडील मरण पावले आहे. घरात कमावता व्यक्ती कुणीच नाही. त्यामुळे बालकावर आईच्या पालनपोषणाची जबाबदारी आली. त्यामुळे आर्यनला काम करणे गरजेचे होते असे त्याने बालसरंक्षण अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सांगितले.
19 एप्रिल 2025 रोजी काळजी व संरक्षणातील बालक आर्यन श्याम जाऊलकर याला बालकल्याण समिती समक्ष जिल्हा बाल सरंक्षण कक्षाच्या आदेशानुसार हजर केले. बालक आर्यन व त्याच्या आईनी दिलेल्या माहिती व संवादावरून कावेरी कंपनीचे एच आर हेड, प्रोजेक्ट मॅनेजर यांनी बालकामगारावर अत्याचार केल्याचे निष्पणन्न् झाले. त्यामुळे बालकल्याण समिती चंद्रपुर यांच्या आदेशावरून दूर्गापूर पोलिस ठाण्यात कंपनीचे एचआर हेड गिरी सिध्दापाली व प्रोजेक्ट मॅनेजर व्यंकटेश रेड्डी रम्नना रेड्डी आणि सहभागी व्यक्ती विरोधात काल शनिवारी तक्रार दाखल करण्यात आली. दुर्गापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 125,351 (2),3(5),अल्पवयीन न्याय कायदा 75,79, बालकामगार अधिनियम 3(A),14 अन्वये कंपनीचे अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.