

Jambhulghat poisoning case
चंद्रपूर: चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील आदिवासी शासकिय माध्यमिक आश्रम शाळेत सोमवारी तब्बल २६७ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने एकच खळबळ उडाली होती. आजाराचे कारण दूषित पाणी असल्याचा संशय निर्माण झाल्याने प्रकृती बिघडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शाळेतील विहिरीला "हे पाणी पिण्यास अयोग्य आहे " असा फलक लावल्याने शाळा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालक आणि आदिवासी संघर्ष समितीने यावर तीव्र नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्यांना तातडीने सुरक्षित पाणी व आवश्यक सुविधा पुरविण्याची मागणी केली आहे.
चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेत एकूण 538 मुले मुली शिक्षण घेतात. सोमवारी सकाळपासूनच तब्बल २६७ विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलट्या, ताप, अशक्तपणा, खाज,सुजन असे लक्षणे असलेल्या आजाराची लागण झाली. शाळा परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वांची तपासणी करून उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक बिघडलेल्या नऊ विद्यार्थ्यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. योग्य उपचारानंतर दोन दिवसांनी त्यांनाही सुटी देण्यात आली. या घटनेने शाळा प्रशासन व आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या मते, शाळेच्या आवारात असलेल्या विहिरीतून व बोरवेलमधूनच पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. शाळेच्या परिसरातील विहीरीतील दूषीत पाणी पिल्यानेच विद्यार्थ्यांना आजार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असतानाच शाळेत एक धक्कादायक बाब समोर आली. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी विहिरीला आश्रम शाळेच्या प्रशासनाने "हे पाणी पिण्यास अयोग्य आहे" असा फलक लावला. त्यामुळे “जर पाणी आधीपासूनच अयोग्य होते, तर विद्यार्थ्यांना ते पाजण्यात आले कसे?” असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला. शिवाय विहीरीला अद्याप पर्यंत झाकन नव्हते,परंतु शाळा प्रशासनाने विहीरीला ग्रीन मॅट लावून झाकले आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यानंतर हा प्रकार घडून आल्याने एकंदर शाळा प्रशासनाच्या कारभारावर चांगलाच संताप व्यक्त होत आहे. शिवाय ज्या विहीरीचे पाणी पिण्यास अयोग्य आहे असे म्हणून फलक लावला त्या विहीरीचे पाणी कोणत्या घटकांमुळे दूषित आहे असी विचारणा होत आहे. रासायनिक व जैविक दृष्ट्या विहीर व बोअरवेलच्या पाण्याची तपासणी नियमित होते का? पाण्याचे शुध्दीकरण नियमित केले जाते का? ऐन वेळेवरच शाळेतील विहीरीचे पाणी योग्य नसल्याचे कसे कळले असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी शाळेतील इतर सुविधांबाबतही गंभीर तक्रारींचा पाढा वाचला आहे. शाळेतील वसतिगृहात पंख्यांची अपुरी व्यवस्था, झोपण्यासाठी योग्य चटया नसणे, स्वच्छ पाण्याची कमतरता, आणि कधी कधी शिळे अन्न खावे लागणे अशा समस्या असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणने आहे.
विशेष म्हणजे, हाकेच्या अंतरावरच आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी असतानाही या शाळेकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ व पालकांनी केला आहे. या प्रकरणात आदिवासी संघर्ष समितीने पुढाकार घेत प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली आहे. विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करून आता आदिवासी विभागाचे प्रशासनाने विद्यार्थ्यांना सुरक्षित पाणी, स्वच्छ अन्न, योग्य निवास व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी पालक व स्थानिक समाजासह पहांदीपारी कृपाल लिंगो आदिवासी संषर्ष समितीचे अध्यक्ष श्री भाऊजी टेकाम यांनी केली आहे.