

Chandrapur BJP vice president resignation
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरातील भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत मतभेद उघड होत आहेत. नुकतेच उपाध्यक्ष राजेंद्र अडपेवार यांच्या राजीनाम्यानंतर, आता दुसरे उपाध्यक्ष राजीव गोलीवार यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. कार्यकर्त्यांना "वेठबिगार" समजून वागवले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
चंद्रपूर भारतीय जनता पार्टीच्या चंद्रपूर महानगराची कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर केवळ दोन दिवसांतच दुसरे उपाध्यक्ष राजीनामा देण्याच्या घटनाक्रमामुळे अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. यापूर्वी कार्यकारिणीचे उपाध्यक्ष राजेंद्र अडपेवार यांनी "पक्षाला निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज उरलेली नाही" असा आरोप करत पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता उपाध्यक्ष राजीव गोलीवार यांनीही काल मंगळवारी अध्यक्ष सुभाष कासनगोटूवार यांना राजीनामा सादर करत नाराजी व्यक्त केली आहे.
गेली 35 वर्षे सक्रियपणे भाजपा संघटनेत काम करणारे गोलीवार यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे की, पक्ष सत्तेत नसतानाही त्यांनी ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहचविण्याचे कार्य निष्ठेने केले. "पूर्वी नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आदर आणि प्रेम होते. मात्र आता चंद्रपूर महानगरात द्वेष व मत्सराचे वातावरण निर्माण झाले आहे. नेत्यांचा आदर करण्याची वृत्ती लोप पावली असून, वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यास नोटीस पाठवल्या जातात. कार्यकर्त्यांना जणू वेठबिगार समजून वागणूक दिली जाते," असा आरोप त्यांनी केला.
त्यांनी पुढे लिहिले आहे की, "दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना सन्मान मिळतो, तर आपले कार्यकर्ते दुर्लक्षित होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवत आम्ही आयुष्यभर कार्य करत राहू, परंतु या कलुषित वातावरणात काम करण्याची इच्छा उरलेली नाही."
गोलीवार यांनी आपला राजीनामा तसेच नाराजीची भूमिका भाजपचे वरिष्ठ नेते आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि आ. किशोर जोरगेवार यांनाही कळविली आहे.