ही घटना वनविभागाच्या केळझर परिक्षेत्रातील कम्पार्टमेंट नंबर 431 मध्ये उघडकीस आली आहे. गणपत लक्ष्मण मराठे असे मृत गुराख्याचे नाव आहे. तो केळझर रहिवाशी होता.
मूल तालुक्यातील केळझर येथील गणपत लक्ष्मण मराठे यांनी शुक्रवारी (दि.10) नेहमीप्रमाणे जनावरे जंगलात चारण्यासाठी घेऊन गेले होते. त्यांनी दिवसभर जनावरे चारली. सायंकाळी जनावरे घराकडे परत आली. परंतु, गुराखी गणपत मराठे घरी परत आले नव्हते. त्यामुळे कुटुंबियांनी काही लोकांच्या मदतीने जंगलात शोधाशोध केली. त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सायंकाळी जंगलात शोधमोहिम राबविली. परंतु त्यांची माहिती मिळाली नाही. रात्र झाल्यामुळे शोध मोहीम बंद करण्यात आली.
शनिवारी पुन्हा वनविभागाने सकाळी शोध मोहीम सुरु केली. प्रादेशिक वनविभागाच्या कम्पार्टमेंट नंबर 431 मध्ये झुडूपात गुराख्याचा मृतदेह आढळून आला. मृत्तदेहावरून गुराख्याचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी प्रादेशिक वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे, एफडीसीएमचे वनपरिक्षेत्राधिकारी बोधे, क्षेत्रसहायक पडवे यांनी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. मृत्तकाचे कुटुंबीयांना वनविभागाने 30 हजाराची आर्थिक मदत केली आहे.