.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
चंद्रपूर : रोवणीचा हंगाम सुरू असल्याने शेतावर गेलेल्या एका ६० वर्षीय शेतकऱ्याला वाघाने ठार केल्याची घटना मंगळवारी (दि.२३) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मिंडाळा शेतशिवारात घडली. दोडकू झिंगरू शेंदरे (रा. मिंडाळा) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोडकू शेंदरे यांची जंगलालगत शेती आहे. मंगळवारी सायंकाळी ते शेतावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. या दरम्यान लगतच्या जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला करून त्याना ठार केले. दोडकू यांच्या शेताजवळ रोवणीचे काम सुरू होते. दोडकू शेतात असताना अचानक दिसेनासे झाले. मात्र काही अंतरावर त्यांना फरफटत नेल्याच्या खुणा आढळून आल्या. त्यानंतर पुन्हा पाहणी केली असता मृत्तदेहाजवळच वाघ बसून होता. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत मजुरांनी वन विभाग व पोलिसांना याची माहिती दिली. याच परीसरात यापूर्वी वाघाने दोघांचा बळी घेतला आहे. आणि आता रोवणीच्या हंगामात ही घटना घडल्याने शेत मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.