

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : शेतामध्ये लाकूड गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये महिला ठार झाल्याची खळबळजनक घटना गुरूवारी (दि.25) देवपायली बिटामध्ये उघडकीस आली आहे. जनाबाई जनार्दन बागडे (वय.51) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या नवानगर येथील रहिवासी होत्या. एका दिवसापूर्वीच याच परिसरात मिंडाळा येथील एका शेतकऱ्याला वाघाने ठार केल्याची घटना ताजी आहे.
जनाबाई बागडे ह्या स्वत:च्या शेतामध्ये धानाचे निंदन करायला बुधवारी (दि.25) गेल्या होत्या. दिवसभर निंदण केल्यानंतर ती सायंकाळी घरी परतल्या नाहीत. बराच उशिर झाल्याने त्यांच्या कुटूंबियांनी शेतावर जाऊन बघितले असता, त्या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे तात्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाच्या चमुने घटनास्थळी येऊन काल रात्री नऊ वाजेपर्यंत शोधाशेाध केली परंतु महिला मिळाली नाही. पाऊस सुरू असल्यामुळे शोधकार्यत अडथळा निर्माण झाला होता. गुरूवारी सकाळी पाच वाजता पासून पुन्हा वन विभागाने शोध मोहीम राबविली. शेतालगतच्या कक्ष क्रमांक 132 मधील परिसरात महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिस व वनविभागाने मृतदेह ताब्यात घेऊन नागभिड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरीता पाठविले. शवविच्छेदन अहवालामध्ये वाघाच्या हल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तळोधी (बा.) वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या वतीने मृतकाचे परिवाराला 25 हजाराची तात्काळ मदत करण्यात आली.