

Railway Reservation Counter Travel Insurance Chandrapur
चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : रेल्वे प्रवाशांची सुविधा आणि प्रवासादरम्यान आर्थिक सुरक्षितता लक्षात घेऊन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने २७ ऑक्टोबर २०२६ पासून आरक्षण काउंटरवरून तिकीट काढणाऱ्या पात्र प्रवाशांसाठीही ऐच्छिक प्रवास विमा योजना (OTIS) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑनलाइन ई-तिकीट बुकिंगसोबतच आता रेल्वे आरक्षण काउंटरवरून तिकीट काढतानाही प्रवाशांना विमा संरक्षणाचा पर्याय निवडता येणार आहे. चंद्रपूर, शिंदेवाही, मूल, नागभीड, वडसा आणि ब्रह्मपुरी येथील रेल्वे स्थानकांवरील आरक्षण काउंटरवर ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
नागपूर मंडळाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आरक्षण काउंटरवरही ऐच्छिक प्रवास विम्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे काउंटरवरून आरक्षित तिकीट घेणाऱ्या पात्र प्रवाशांनाही प्रवासादरम्यान आर्थिक संरक्षण मिळविण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यासाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स (CRIS) आणि IRCTC यांच्या समन्वयातून आवश्यक तांत्रिक व्यवस्था करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत प्रति प्रवासी केवळ ४५ पैसे, सर्व करांसह, प्रीमियम भरून पॉलिसीच्या अटींनुसार १० लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळू शकते. अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास १० लाख रुपये, तर कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व आल्यास ७.५० लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षणाची तरतूद आहे. याशिवाय, अपघातामुळे रुग्णालयात दाखल झाल्यास वैद्यकीय खर्चासाठी दोन लाख रुपयांपर्यंत आणि पार्थिव शरीराच्या वाहतुकीसाठी १० हजार रुपयांपर्यंत मदत मिळण्याची तरतूद आहे. हे सर्व लाभ संबंधित विमा पॉलिसीतील नियम, अटी आणि अपवादांच्या अधीन असतील.
ही विमा योजना पूर्णपणे ऐच्छिक असून प्रवाशाच्या संमतीनंतरच विमा लागू होईल. विमा घेऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांनी वैध मोबाइल क्रमांक देणे आणि निर्धारित प्रीमियमची रक्कम डिजिटल माध्यमातून भरणे आवश्यक आहे. कन्फर्म, आरएसी तसेच अंशतः कन्फर्म आरक्षण असलेल्या पात्र प्रवाशांना निर्धारित नियमांनुसार या सुविधेचा लाभ घेता येईल. मात्र, बर्थ किंवा आसनाशिवाय प्रवास करणारी पाच वर्षांखालील मुले या विमा संरक्षणात समाविष्ट नाहीत.
विमा पॉलिसी जारी करणे आणि पात्र दाव्यांचा निपटारा करण्याची जबाबदारी संबंधित विमा कंपनीची असेल. विम्यासंदर्भातील चौकशी किंवा दावा करण्यासाठी प्रवाशांना पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या तपशिलानुसार थेट विमा कंपनीशी संपर्क साधावा लागेल. भारतीय रेल्वे किंवा IRCTC विमा दाव्यांचा निपटारा करत नाही. रेल्वे प्रशासनाकडून आरक्षण काउंटरवरील कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन ही सुविधा सुरळीतपणे राबविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे चंद्रपूर, शिंदेवाही, मूल, नागभीड, वडसा आणि ब्रह्मपुरी येथील रेल्वे स्थानकांवरील आरक्षण काउंटरवरून तिकीट काढणाऱ्या पात्र प्रवाशांना २७ ऑक्टोबरपासून ऐच्छिक प्रवास विम्याचा लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.