

बेळगाव : बेळगाव-कोल्हापूर रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण सुरु झाले आहे. रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक पथकाने पाहणी, मोजणी आणि आराखडा तयार करण्याचे काम सुरु केले आहे. पुण्यातील मोनार्क सर्व्हेयर्स अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट लिमिटेडकडे हे काम सोपवण्यात आले असून सुमारे ५५ लाख रुपये खर्चातून हे काम हाती घेण्यात आले आहे.
सर्वेक्षणासाठी ड्रोन, जीपीएससह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या रेल्वे मार्ग धारवाड-कित्तूर-बेळगावमार्गे संकेश्वर, कोल्हापूर असा कॉरिडरचा भाग आहे. त्यापैकी सध्या धारवाड-कित्तूरमार्गे बेळगावचे काम पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असले तरीही उर्वरीत मार्गाचे काम केव्हा सुरु होणार याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे.
२०१२ मध्ये कराड-बेळगाव असा १९१ किलोमीटरचा (मध्य रेल्वे पुणे) सर्व्हे होऊन अहवाल बोर्डाला पाठविण्यात आला होता. दरम्यान नैर्ऋत्य रेल्वे (हुबळी) यांनी एस्कॉन टेक्नॉलॉजीतर्फे पाच्छापूर-संकेश्वर-कोल्हापूर ८३ किलोमीटर प्राथमिक सर्व्हे असे दोन वेगळे सर्व्हे केले होते. मात्र, रेल्वे बोर्डाने नियोजित मार्गास प्रतितास १६० (ब्रॉडगेज) कि.मी. इतक्या कमाल वेगाने नियोजित रेल्वेसाठी परकनट्टी-संकेश्वरमार्गे कोल्हापूर (८५ कि. मी.) असे प्राथमिक अभियांत्रिकी व ट्राफिक (पीईटी) सर्व्हेच्या खर्चास ५५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे मोनार्क सर्व्हेयर्स अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट लि., पुणेतर्फे सर्व्हे करून मार्किंग करण्यात आले आहे.
संकेश्वर भागात निपाणीतून कणगला केआयडीबी (गवानी वगळता) सीमेची लक्ष्मी हरगापूर तलाव, अंकलेनजीक चोरगे व पिंपले जमिनीच्या नाल्याजवळून संकेश्वरातील निडसोशी रोड, स्वस्तिक गॅस, गोदाम घाटगे मळा, हौसिंग कॉलनी, कमतनूर रस्त्यात रवंदी शेत, कमतनूर गेट, नेरली दर्गामार्गे हुक्केरी असा सर्व्हे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करण्यात आले आहे. सर्व्हे झालेल्या ठिकाणी लाल व पांढऱ्या रंगाचे मार्किंग पट्टे मारण्यात आले आहेत.
दरम्यान, रेल्वेमार्गात येणाऱ्या नाल्याची लांबी व रुंदी, पाण्याचा प्रवाह यांची माहिती घेण्यात आली आहे. हा मार्ग उभय राज्यांना वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. यासाठी सर्व्हेचा अहवाल सादर केल्यावर याविषयी अंतिम निर्णय रेल्वे बोर्ड व केंद्र सरकार घेणार आहे. या प्रकल्पास कर्नाटक शासन मोफत जमीन व ५० टक्के निधी देत आहे.