

Palgaon residents' sit-in protest continues in front of cement company
चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
कोरपना तालुक्यातील पालगाव येथील नागरिकांनी तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या मागणीसाठी काल सोमवारी दुपारी 12 वाजल्यापासून आवारपूर येथील सिमेंट कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. अद्याप 22 तास होऊनही ठिय्या आंदोलन सुरूच आहे.
या आंदोलनात राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे सहभागी झाले आहेत. मागणी पूर्ण होईपर्यंत हटणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
सिमेंट कंपनीची खदान पालगाव परिसरात आहे. गावात जाण्यासाठी वापरला जाणारा एकमेव मार्ग कंपनीच्या हद्दीतून जातो. या 3 किलो मिटर मार्गाची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे. सध्या या मार्गाची पायवाटे प्रमाणे अवस्था झाली आहे.
गावकऱ्यांनी वारंवार कंपनीकडे सिमेंट रस्ता बनविण्याची मागणी केली. मात्र कंपनीचे याकडे दुर्लक्षच झाले आहे. चाळीस वर्षापासून मागणी करूनही कंपनी दुर्लक्ष करीत असल्यामुळे पालगाववासीयांचा संयम सुटला. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत, काल दुपारी बारा वाजता सिमेंट कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर महिला-पुरूष अशा दोनशे नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे.
सायंकाळपर्यंत तेथेच आंदोलन सुरू होते. परंतु कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आंदोलनकांनी आपला मोर्चा कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे वळविला. सायंकाळपासून आज मंगळवारी 22 तासापर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले आहे. काल माहिती होताच राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळ हे आंदोलनात सहभागी झाले. आजही त्यांचा आंदोलनात सहभाग आहे. आंदोलनाला तब्बल 22 तासांचा अवधी झाला आहे. "आमच्या हक्काचा रस्ता मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, "असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने आजी आंदोलन सुरूच सुरूच आहे.
कंपनीमध्ये जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक रस्ता नौकारी मार्गे होता. काल सोमवारी कंपनीमध्ये जाण्यासाठी रस्ता सुरू होता. तर दुसरा रस्ता मुख्य नांदाफाटा हा मार्ग बंद केला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना एकाच मार्गाने जावे लागले. परंतु आंदोलनाकडे कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कंपनीचा दुसरा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांना येजा करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केल्याने आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.