

India-Pak Tension
पहलमागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्ताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बंद दाराआड एक महत्त्वाची बैठक घेतली. पाकिस्तान सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य आहे. त्यांनीच अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांमधील परिस्थितीवर बंद दाराआड चर्चा करण्याची विनंती केली होती. पाकिस्तानच्या विनंतीवरून ही बैठक बोलावण्यात आली होती, परंतु बैठकीनंतर, परिषदेने किंवा कोणत्याही देशाने या विचारमंथनाबाबत कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. संयुक्त राष्ट्रमध्ये (युनो) भारताविरोधात कांगावा करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला आहे.
जगातील अनेक देशांसमोर पाकिस्तानचा अपमान झाल्यानंतर मे महिन्यासाठी परिषदेचे अध्यक्ष असलेल्या ग्रीसने सोमवारी दुपारी बैठकीचे नियोजन केले होते. विशेष म्हणजे सोमवारी बंद दाराआड बैठकही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) चेंबरमध्ये झाली नाही. सल्लागार कक्षात १५ देशांच्या सुरक्षा परिषदे प्रतिनिधींची बैठक सुमारे दीड तास चालली. संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावावर चर्चा करण्यासाठी आणि परिस्थिती हाताळण्याबाबत विचारमंथन करणे हे या बैठकीचे उद्दिष्ट होते. या बैठकीत संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. काही सदस्यांनी विशेषतः पर्यटकांना त्यांच्या धार्मिक श्रद्धेच्या आधारावर लक्ष्य करण्याचा मुद्दा उपस्थित केला. अनेक सदस्यांनी पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र चाचण्या आणि अणुभाषण हे चिथावणीखोर घटक असल्याची चिंता व्यक्त केली. या बैठकीत भारतासोबत द्विपक्षीयपणे मुद्दे शोधण्याचा सल्ला देण्यात आला, असे वृत्त एएनआयने दिले आहे.त्यामुळे भारताविरोधात आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कांगावा करण्याचा पाकिस्ताना प्रयत्न फसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ट्युनिशियाचे खालेद मोहम्मद खैरी, राजकीय आणि शांतता निर्माण प्रकरणे आणि शांतता ऑपरेशन्स विभागातील मध्य पूर्व, आशिया आणि पॅसिफिकसाठी सहाय्यक महासचिव, यांनी दोन्ही विभागांच्या (डीपीपीए आणि डीपीओ) वतीने परिषदेला या प्रकरणाची माहिती दिली. बैठकीतून बाहेर पडताना ते म्हणाले की, हा संघर्ष संवादाद्वारे शांततेने सोडवला पाहिजे. सध्या परिस्थिती अस्थिर आहे, त्यामुळे संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
संयुक्त राष्ट्रांमधील ग्रीसचे स्थायी प्रतिनिधी, मे महिन्यासाठी सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष राजदूत इव्हान्जेलोस सेकेरिस यांनी ही बैठक फलदायी असल्याचा दावा केला. बैठकीत झालेल्या चर्चेची अधिक माहिती न देता, त्यांनी परिस्थिती सुधारण्यासाठी बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीपूर्वी, संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले होते की, "अशा चर्चेतून कोणताही अर्थपूर्ण निकाल अपेक्षित नाही. संघर्ष किंवा तणावातील कोणताही पक्ष परिषदेच्या सदस्यत्वाचा वापर करून धारणा घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला काही अर्थ नाही.भूतकाळाप्रमाणे आजही पाकिस्तानचे ढोंगीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. या देशाला अपेक्षेप्रमाणे सुरक्षा परिषदेकडून कोणताही अर्थपूर्ण प्रतिसाद मिळाला नाही. सुरक्षा परिषदेत हस्तक्षेप करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय राजनैतिकतेने पुन्हा एकदा यशस्वीरित्या हाणून पाडला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका या पाच व्हेटो अधिकार असलेल्या स्थायी सदस्यांव्यतिरिक्त, परिषदेत अल्जेरिया, डेन्मार्क, ग्रीस, गयाना, पाकिस्तान, पनामा, दक्षिण कोरिया, सिएरा लिओन, स्लोव्हेनिया आणि सोमालिया हे १० अस्थायी सदस्य आहेत.