

चंद्रपूर : नागभिड तालुक्यात मागील दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपिटी झाल्याने उन्हाळी धानपीक भुईसपाट झाले. यामध्ये तालुक्यातील चिंधीचक, चिंधीमाल, तळोधी (बा) उश्राळमेंढा, गंगासागर हेटी, सावरला, वाढोणा येथील परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे आस्मानी संकटामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.५) दुपारी १ च्या दरम्यान नागभीड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची तहसीलदारांना आपबिती सांगितली. व नुकसान भरपाईसाठी निवेदन दिले. तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेत त्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात धानाचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी नागभीड हा एक तालुका आहे. येथील शेतकऱ्यांचे मुख्य पीक धान असून त्यावरच शेतकऱ्यांची उपजिवीका चालते. नागभिड तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकांच्या लागवडीवर भर देऊन मोठ्या प्रमाणात पीक घेतले. बारीक व ठोकळ जातीच्या धानपिकांची लागवड करण्यावर शेतकऱ्यांनी दुप्पटीने खर्च केला. मात्र, पंधरवाड्यात धानपिक हातात येणार असतानाच शेतकऱ्यांच्या उन्हाळी धानपिकाचे हिरवंगार, स्वप्न गारपिटीने उद्ध्वस्त केले आहे. नागभिड तालुक्यातील चिंधीचक, चिंधीमाल, किटाळी बोर., मांगरूड, तळोधी (बा.) परिसरातील उश्राळमेंढा, गंगासागर हेटी, आकारपूर, सावर्ला,लखमापूर, खरकाडा,आलेवाही शेतशिवारात मागील दोन दिवसांत झालेल्या गारपिटच्या तडाख्याने संपूर्ण धानपीक अडवे झाले. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी नागभीड तहसील कार्यालयावर मोठ्या संख्येने मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी तहसीलदार प्रतापराव वाघमारे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले.
गारपिटीमुळे नुकसान झालेल्या धानपिकांची खासदार नामदेवराव किरसान यांनी सोमवारी (दि.५) पाहणी केली. त्यानंतर शेतकऱ्यांची संवाद साधत शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी करणार असल्याचे सांगितले.