

Maharashtra Weather Update
नागपूर : उपराजधानीत सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागात गारांचा पाऊस पडला. दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह अचानक गारांचा पाऊस पडला, नंतर पुन्हा कडकडीत ऊन पडल्याने नागपूरकरांना उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनोखा अनुभव मिळाला.
शनिवारी दुपारी नागपूरकर कडक उन्हाच्या झळांनी त्रस्त असतानाच अचानक वादळ वाऱ्यांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. उन्हाळ्यात पावसाळा असा काहीसा विचित्र अनुभव नागपूरकरांना अनुभवास आला. शांतीनगर, पारडी परिसरात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला. काही वेळातच पुन्हा सूर्यदेवाने आपले उग्र रूप दाखविले. प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मे महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. गुजरात, राजस्थान, बिहार, झारखंड, ओडिसामधील काही भाग वगळता संपूर्ण भारतात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. यात विदर्भाचाही समावेश आहे. मे महिन्यात विदर्भात कमाल तापमानाच्या तुलनेत किमान तापमानात अधिक वाढ होईल असा अंदाज आहे. विदर्भाच्या ईशान्य आणि आग्नेय भागात उष्ण दिवसाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. एकंदरीत यंदाचा मे महिना विचित्र हवामानाचा असेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.