

Massive fire breaks out at Jibi Art Stationery Book Stall in Chandrapur
चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
चंद्रपूर शहरातील नागपूर मार्गावरील जनता महाविद्यालयाला लागून असलेल्या जीबी आर्ट स्टेशनरी बुकस्टॉलला आज (१९ मे) ला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये सुमारे ५० लाखांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमन दलाने भीषण आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. जीवन धकाते यांच्या मालकीचे दुकान होते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील नागपूर मार्गावरील जनता महाविद्यालयाजवळ अनेक वर्षांपासून जीबीआर स्टेशनरी नावाचा बुक स्टॉल आहे. या परिसरात शाळा महाविद्यालय असल्याने विद्यार्थी यातून विविध प्रकारची पुस्तके खरेदी करतात. त्यामुळे या ठिकाणी विविध प्रकारची पुस्तके व स्टेशनरी साहित्य विक्री केले जात आहे. आज सोमवारी पहाटेच्या सुमारास जीबी आर्ट स्टेशनरी बुकस्टॉलला भीषण आग लागली.
आगीची घटना काही नागरिकांच्या लक्षात आली. लगेच जीबी आर्ट स्टेशनरी बुकस्टॉलचे मालक जीवन धकाते यांना माहीत झाली. लगेच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. काही वेळातच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. यावेळी स्टेशनरी बुक स्टॉलचा बहुतांश भाग जळून खाक झाला होता. उर्वरित भागाला वाचवण्यासाठी अग्निशामक दलाने बंबाद्वारे पाण्याचा वर्षाव केला.
दुकानामध्ये पुस्तकं व स्टेशनरी असल्यामुळे आग प्रचंड भडकली होती. त्यामुळे आगीला आटोक्यात आणण्यासाठी बराचवेळ लागला. मोठ्या प्रमाणात पाण्याचा वर्षाव केल्यानंतर आग आटोक्यात आली.
आगीमध्ये विविध प्रकारची महागडी पुस्तके, स्टेशनरी साहित्य जळून खाक झाले आहे. जीवन धकाते यांच्या मालकीच्या असलेल्या स्टेशनरी दुकानाचे आगीत सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे. सदर दुकानाच्या जवळपास अनेक छोटी-मोठी दुकाने होती, परंतु अग्निशामक दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला आहे.