

Chhota Matka Tiger Hnting after Injury in Tadoba Tiger Reserve
चंद्रपूर: नयनतारा वाघिणीवरील प्रेमापोटी आणि ताडोबातील त्याच्या अधिवासात घुसखोरी करणाऱ्या ब्रम्हा वाघाला बुध्द पौर्णिमेच्या रात्री ठार केल्यानंतर ताडोबा किंग छोटा मटकाने गुरूवारी (दि.१५) रामदेगी परिसरात जखमी झाल्यानंतर पहिल्यांदाच एका वन्यप्राण्याची शिकार करून भूक भागविल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्याच्या प्रकृतीची काळजी घेण्याकरीता पशु वैद्यकिय अधिऱ्यांसह सुमारे 42 जणांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. ट्रॅप कॅमेरे आणि काहीच अंतरावरून अधिकारी, कर्मचारी, वनमजूर त्याच्यावर दैनंदिन पाळत ठेवून आहेत. त्याची प्रकृती ठणठणीत होत असल्याचे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
ताडोबातील एक प्रभावशाली नर वाघ म्हणून ओळख असलेला सामर्थ्यवान, उत्साही आणि आक्रमक स्वभावाचा छोटा मटका वाघ ताडोबाचा राजा आहे. रूबाबदार शैलीने त्याच्या दर्शनासाठी ताडोबामध्ये पर्यटक सफारीला गर्दी करतात. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रामदेगी क्षेत्रात त्याचे प्रस्थ आहे. त्याची शौर्यपूर्ण भटकंती, सशक्त शरीरयष्टीच्या छोटा मटकाला नयनताराचे विशेष आर्कषण आहे. तो निळ्या डोळ्यांच्या नयनतारेच्या प्रेमात आहे. त्यामुळे त्याच्या अधिवासातील क्षेत्रात तो अन्य वाघांची घुसखोरी सहन करीत नाही. मागील पाच ते सहा वर्षांपासून या क्षेत्रात छोटा मटका व नयनतारेचेही वास्तव्य आहे. आतापर्यंत अनेक वाघांनी छोटा मटकाच्या क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. बजरंग व मोघली यांना यापूर्वीच ठार केले आहे. त्यानंतर ब्रम्हाने बजरंग व मोघली यांच्या प्रमाणे त्याच्या अधिवासात येण्याची चुक केली. आणि बुध्द पौर्णिमेच्या रात्री जोरदार लढाई झाली. यामध्ये छोटा मटकाने ब्रम्हाला यमसदनी धाडले. परंतु या लढाईत तो स्वत:ही जखमी झाला आहे. पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्याला व्यवस्थीत चालता येत नाही.
सध्या जखमी छोटा मटका ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरझोनमधील रामदेगी परिसरातच वास्तव्यास आहे. पायाला दुखापत असल्याने तो फार लांब पर्यंत चालू शकत नाही. त्यामुळे रामदेगी परिसरात त्याच्यावर पशु वैद्यकिय अधिकारी, वनाधिकारी, वनमजूरांच्या देखरेखीत दिवस रात्र निगराणीत नैसर्गिक उपचार सुरू आहे.
वन परिक्षेत्राधिकारी यांचे नेतृत्वात वन सहायक 2, वनरक्षक 4, वन कर्मचारी 20, फायर वॉचर (PRT) 15 असे एकूण 42 वन अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा छोटा मटकाच्या दिमतीला उभा आहे. घटनेच्या दोन दिवसांनी ताडोबा बफर झोनचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी रामदेगी परिसरात भेट देऊन छोटा मटकाच्या प्रकृतीची पाहणी केली. घटनेच्या चौथ्या दिवशीही 42 जणांचा ताफा त्याच्यावर निगराणी ठेवून प्रकृतीची काळजी घेत आहे. सध्या रामदेगी परिसरातच जखमी छोटा मटका वास्तव्यास असून त्याला फारसे चालता येत नसल्याने त्याने लांबवर चालून जाणे टाळले आहे. विशेष म्हणजे त्याच्या अधिवासाच्या ठिकाणापासून सुमारे एक किमीच्या अंतरावरच उमरी खोरा, चिचाळ बोडी परिसरात नयनतारा वाघिणीचे वास्तव्य आढळून आले आहे. नयनतारा सुध्दा सध्या जखमी छोटा मटकाच्या अवतीभवती दिसून येत आहे.
नैसर्गिक उपचार सुरू असताना छोटा मटकाबाबत एक आनंदाची बातमी समोर आली. जखमी झाल्यानंतर घटनेच्या तिसऱ्या दिवशी (गुरूवारी) पहिल्यांदाच एका वन्यप्राण्याची शिकार करून त्याने भूक भागविल्याची माहिती आहे. शिकारीच्या घटनेबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही दुजोरा दिला आहे. भूक भागविण्यासाठी केलेल्या शिकारीमुळे छोटा मटकाची प्रकृती ठणठणीत होत असल्याचे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
या पूर्वीही छोटा मटका जखमी झाला आहे. नैसर्गिक उपचाराने तो दुरूस्त झाला. यावेळी तो नैसर्गिक उपचारातूनच झालेल्या दुखापतीवर मात करून ठणठणीत होईल, अशी प्रतिक्रिया ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे.