

चंद्रपूर : चंद्रपुरात दैनंदिन कार्य करीत असताना मानव व वाघांमधील संघर्ष प्रचंड टोकाला पोहोचला आहे. मागील आठ दिवसात आठ जणांचा वाघांनी बळी घेतला आहे. नागरिकांचे दरदिवशी जीव जात असतानाही वनविभाग, जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे वनमंत्री वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतेही पाऊले उचलताना दिसत नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. वाघांचा बंदोबस्त तत्काळ केला नाही तर मृतदेहच वनविभागाच्या दारात आणून ठेवू, असा इशारा काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी (दि.१८) चंद्रपुरात दिला. चंद्रपुरातील अतिरिक्त असलेल्या वाघांना हलविण्याची मागणी करत त्यांनी उद्या राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले.
पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे, ती भुषणावह बाब आहे. ताडोबा व्यक्तीरिक्त जिल्ह्यात प्रचंड वाघांची संख्या वाढल्याने नागरिकांना दैनंदिन कामे करणे कठीण झाले आहे. मागील १० मे पासून आज रविवारपर्यंत नऊ दिवसात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या सहा महिला व दोन पुरूष असे एकूण आठ जणांचा वाघांनी बळी घेतला आहे. त्यामुळे काहींचे कुटुंब महिलांविना पोरके झाले आहे. तर काहींचे कर्तेच पुरूष गेल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे. संपूर्ण जिल्ह्यात शेतकरी, शेजमजुरांना जीवन जगणे आणि शेती करणे कठीण झाले आहे. त्यामुळे जंगलाला लागून असलेले शेत व गावांना अत्याधुनिक कुंपन घालण्याची मागणी करीत आहोत, परंतु सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही, असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
वाघाने मानवाचा जीव घेतल्यानंतर त्याला मिळणाऱ्या पैशातून त्याचा जीव येणार आहे का? तत्कालीन पालकमंत्र्यांनी आम्ही पैसे वाढविले म्हणून मोठा गाजावाजा गेला. परंतू, वाढलेल्या पैशाने माणसाची किंमत मोजता येईल का? गेलेला जीव परत आणता येईल का ? असा सवाल करीत वडेट्टीवार यांनी तुम्ही वनविभागाच्या लोकांचा बळी द्या, आणि त्यांना मदत करा, असे म्हणत सरकारला धारेवर धरले. वाघाच्या हल्ल्यात निष्पाप लोकांचा बळी जात आहे. तरीही सत्ताधारी काहीही करताना दिसत नाहीत. आठ दिवसात आठ जणांचा बळी गेल्यानंतरही जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष द्यायला तयार नाहीत. पालकमंत्र्यांनी तत्काळ याबाबत बैठक बोलविण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. आमच्यामुळे वाघ वाढले म्हणणारे आता “ब्र” का काढत नाहीत ? असा सवालही त्यांनी यावेळी केला.