शेतातील पिकाचे वन्यप्राण्यांपासून नुकसान टाळण्यासाठी तार लावत असताना, विद्यूत प्रवाह सुरू होऊन शॉक लागून चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.11) सकाळी 10 वाजताच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर शेतशिवारात घडली. या घटनेमुळे गणेशपूर गावात शोककळा पसरली आहे. पुंडलिक मुखरू मानकर (वय 62), प्रकाश खुशाल राऊत (वय 42), युवराज डोंगरे (वय 40) नानाजी पुंडलिक राऊत (वय 62) असे मृतकांचे नावे आहेत. एक जण किरकोळ जखमी झाला आहे. हे सर्व जण गणेशपूर गावातील रहिवासी होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर येथील नानाजी पुंडलिक राऊत यांचे शेतात धानाची लागवड करण्यात आली आहे. हे शेत जंगलाला लागून आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हैदोसाने पिकाचे मोठे नुकसान होत आहे. बुधवारी (दि.11) सकाळी नानाजी राऊत यांचे शेतात पाच शेतकरी धानाला खत मारण्याकरीता गेले होते. गेल्यानंतर सर्वप्रथम सर्वांनी खत मारले. त्यानंतर जंगलातून येणाऱ्या वन्यप्रण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्याकरीता जंगलाच्या बाजूने शेताच्या तार लांबविण्याचे काम सुरू होते. पाचही जणामध्ये तार लावत असतानाच समन्वय न राहिल्याने विद्युत प्रवाह सुरू झाला त्यामुळे एकाचवेळी पाचही जणांना जोरदार विद्यूत शॉक लागला.
या घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झाला तर एक शेतकरी जखमी झाला आहे. सदर घटनेची माहिती गावात होताच नागरिक शेतातकडे धावून गेले. लगेच पोलिस विभागाला माहिती देण्यात आली. मेंडकी पोलिसांनी घटनास्थळी येऊन चारही जणांचे मृतदेह ताब्यात घेतले. चौघांचे मृतदेह ब्रम्हपुरी येथे शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले. सायंकाळ पर्यंत चारही मृतदेहाचे शवविच्छेद करण्यात आले. किरकोळ जखमीवर उपचार करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. सध्यातरी तार लावताना समन्वयक न राहिल्याने विद्युत प्रवाह झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.