

Chimur taluka Uma river crossing issue
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील चिचाळा (रिठ) परिसरात वरोरा चिमूर मार्गावर ब्रिटिश कालीन लोखंडी पुलाजवळ उमानदी पार करण्यासाठी कोणतीही सरकारी सुविधा नसताना, एका युवा शेतकरी प्रवीण दयाराम चौके यांनी स्वतःच्या कल्पकतेने तयार केलेल्या थर्माकोल-टिनशीटद्वारे तयार केलेल्या नाविन्यपूर्ण ‘जुगाड बोटीतून’ तब्बल 50 ते 60 शेतकरी आणि महिला मजूर रोज नदीपार जात आहेत.
150 फूट रुंद, 8 फूट खोल नदीपात्रात हा अभिनव उपक्रम त्यांच्या रोजच्या धोकादायक प्रवासाला तात्पुरता ‘जीवनमार्ग’ देतो; आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेला तोच आरसा दाखवतो. सरकारी यंत्रणा वर्षानुवर्षे आश्वासने देत असताना, एका युवकाने केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. शिवाय शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
वरोरा चिमूर मार्गावरील ब्रिटिश कालीन लोखंडी पुलाजवळ चिचाळा (रिठ) परिसरातील शेतकऱ्यांची शेती उमानदीच्या पलीकडे असल्याने रोज नदी पार करून जावेच लागते. प्रशासनाने कधीच सुरक्षित मार्ग दिला नाही, म्हणून युवा शेतकरी प्रवीण चौके यांनी स्वतःच्या हिशोबाने थर्माकोल व टिनशीट जोडून अनोखी बोट तयार केली. ही कल्पक बोट तयार करताना त्याने नदीच्या दोन्ही तीरांना दोरी बांधली, जेणेकरून महिलांना आणि शेतकऱ्यांना सुरक्षितपणे ओलांडता येईल. एका वेळी दोन महिला किंवा दोन मजूर नदीपार जातात आणि एक बाजूचा व्यक्ती दोरी ओढून बोट वाहून नेतो.
गेल्या काही वर्षांतील अवैध वाळूउत्खननामुळे नदीचे पात्र खोल गेले आणि पूर्वीचा पारमार्ग पूर्णतः नाहीसा झाला. पूर्वी उथळ पाण्यातून सहज जाता येत होते, पण आता नदी पातळी 8 ते 10 फूटपर्यंत खोल गेल्याने प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. याच अडचणीसमोर युवकाने स्वतःचा वेळ, परिश्रम आणि संसाधने वापरून हा तात्पुरता ‘होडीमार्ग’ तयार केला. त्यात कोणतीही सरकारी मदत नाही.
महिला मजुरांना सकाळी कामावर जाण्यासाठी नदी पार करणे आवश्यक होते. जंगलातून 10 किलोमीटरचा धोकादायक वळसा हा एक पर्याय होता तर दुसरा युवकाने बनविलेली ‘थर्माकोल बोट. यातून जाणं धोकादायक आहे, पण याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. या मुलाने बोट तयार केली नसती तर आम्ही कामावर जाऊच शकत नव्हतो. त्याच्या उपक्रमाने महिलांना धीर, तर शेतकऱ्यांना तात्पुरता मार्ग मिळाला.
शेतकऱ्यांनी अनेकदा कल्व्हर्ट, पूल किंवा नदीमार्गाविषयी प्रशासनाशी संपर्क साधला. आश्वासने मिळाली, पण प्रत्यक्षात एकही काम सुरू झाले नाही. नाही सर्व्हे, नाही मंजुरी, नाही काम, फक्त वर्षानुवर्षे ‘लवकरच सोडवू’ अशी आश्वासने. यातच एका युवा शेतकऱ्याने मात्र विलंब न करता समस्या हातात घेऊन जुगाडातून मार्ग निर्माण केला.
पावसाळ्यात नदीचा प्रवाह वाढतो, खोली वाढते आणि प्रवास अधिक धोकादायक होतो. तरीही हा जुगाडच महिलांना शेतात पोहोचवतो. ही स्थिती ग्रामीण भागातील प्रशासनिक अपयशाचे उदाहरण आहे, पण त्याच वेळी युवकाचा नाविन्यपूर्ण जुगाड हा मानवतेचा आणि कल्पकतेचा उत्तम नमुना आहे. एका साध्या ग्रामीण युवा शेतकऱ्याने स्वतःच्या खर्चातून, कल्पनाशक्तीने आणि चौकटीबाहेर विचार करून नदीवर मार्ग बनवला तर प्रचंड निधी, यंत्रणा, कर्मचारी, लोकप्रतिनिधी असलेल्या प्रशासनाला एक कल्व्हर्ट, एक पूल किंवा एक सुरक्षित पारमार्ग का देता आला नाही? अशी विचारणा ग्रामीण भागातील लोक विचारत आहेत.
सरकार काही करत नाही, पण युवा शेतकरी प्रवीण चौके यांनी आम्हाला जिवंत ठेवणारा मार्ग तयार केला.
- विकास घोडमारे, शेतकरी