

Chandrapur 363 persons hadipar action
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, मतप्रक्रियेदरम्यान कुठलीही गडबड होऊ नये आणि सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी जिल्हा पोलीस दलाने मोठी कारवाई केली आहे.
नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (2) लागू करून एकूण ३६३ जणांना तीन दिवसांसाठी त्यांच्या संबंधित पोलीस स्टेशन हद्दीत प्रवेश करण्यास मनाई (हद्दपार) करणारा आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र, या व्यक्तींना मतदानाच्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी १२ दरम्यान मतदानाचा अधिकार वापरण्यास सवलत देण्यात आली असून त्यांना मताधिकारापासून वंचित ठेवले जाणार नाही.
नगर परिषद आणि नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकांचा पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने कमालीची तयारी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन तसेच अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस स्टेशन प्रभारी यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाईची नोंद केली आहे.
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शांतता भंग करण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर कलम 163(2) – भारतीय नागरिक सुरक्षा संहिता–2023 नुसार संबंधित व्यक्तींना हद्दीत प्रवेशबंदीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. अपर पोलीस अधीक्षकांकडे दाखल प्रस्तावांवरून – २७८ व्यक्तीं, उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे दाखल प्रस्तावांवरून – ८५ व्यक्तीं असे एकूण ३६३ इसमांना तीन दिवसांसाठी हद्दपार आदेश जारी करण्यात आला आहे.
मतदानाचा अधिकार कायम :
जरी कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने या व्यक्तींना त्यांच्या पोलीस स्टेशन हद्दीत प्रवेशावर तात्पुरती मर्यादा आणण्यात आली असली तरी लोकशाहीचा मूलभूत अधिकार असलेला मताधिकार काढून घेतलेला नाही.
निवडणुकीच्या दिवशी सकाळी ०८:०० ते दुपारी १२:०० या वेळेत त्यांना संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची कायदेशीर परवानगी दिली आहे.
या संपूर्ण कारवाईचा उद्देश निवडणूक काळात कुठलीही गोंधळाची, हिंसाचाराची किंवा बेकायदेशीर हालचालींची शक्यता कमी करणे हा आहे. जिल्हाभर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून मतदानाच्या दिवशी अतिरिक्त पथके तैनात राहणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचा शांततेत व सुरळीत पार पडल्यानंतर लोकशाही प्रक्रियेला अधिक बळकटी मिळेल, या उद्देशाने ही कारवाई जिल्हा पोलीस दलाने केली आहे.