

चंद्रपूर : शासनाच्या ई-पिक ॲपमुळे शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत. कधी सर्व्हर डाऊन तर कधी ॲप बंद पडल्याने नोंदणीची प्रक्रिया ठप्प झाली आहे. परिणामी शेतकरी वेळेत नोंदणी करू शकत नसल्याने विमा, पूरबुडी मदत, धान खरेदी व इतर शासकीय योजनांच्या लाभापासून त्यांना वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पूरबुडीकरिता मदत मिळवणे, पिक विमा घेणे, शेतमालाची नोंदणी करून सरकारी धान खरेदी केंद्रावर विक्री करणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी इ-पिक नोंदणी आवश्यक आहे. मात्र सतत सर्व्हर डाऊन होत असल्याने शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेती व्यवहारात महत्त्वाचे स्थान असलेल्या ई-पिक ॲपमुळे शेतकऱ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. परिणामी शेतकरी शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहात असून त्यांच्या आर्थिक संकटात आणखी भर पडली आहे.
या गंभीर प्रश्नावर वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत पुणेकर यांनी शासनाकडे तीव्र शब्दात मागणी केली आहे. “शासनाच्या अकार्यक्षम व निष्काळजी धोरणामुळे शेतकरी भरडला जात आहे. ई-पिक ॲप तातडीने दुरुस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल,” असा इशारा त्यांनी दिला.
सध्या शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी पसरली असून शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ तोडगा काढावा, अशी एकमुखाने मागणी होत आहे.