

Jambhulghat students food poisoning case
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील जांभुळघाट येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळेत काल मंगळवारी शेकडो विद्यार्थ्यांना मळमळ उलट्या, पोटदुखी, खाज, अंगावर सुज तर चक्कर येण्याचा प्रकार सुरूल्यामुळे सुमारे 267 विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला. त्यापैकी 9 विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना चिमुर येथील उपजिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी 7 जणांना रूग्णालयातून उपचारानंतर सुटी देण्यात आली. अद्याप दोघांवर उपचार सुरू आहेत.
शिळे अन्न किंवा दुषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रकारामुळे खळबळ माजली असून पालक वर्ग चिंतेत आहेत. चिमुर तालुक्यातील जांभूळघाट येथे निवासी आदिवासी शासकिय आश्रमशाळा आहे. येथे एकूण ५३८ विद्यार्थी (मुले मुली ) शिक्षण घेत आहेत. सोमवारी (११ ऑगस्ट) रोजी विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना मळमळ उलट्या, पोटदुखी, खाज, अंगावर सुज तर चक्कर येण्याचा प्रकार सुरू झाला.
शाळेच्या परिसरात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले. यामध्ये तब्बल २६७ विद्यार्थी बाधीत झाले. त्यापैकी वेदीका चौधरी (वर्ग ४), राजेश नानाजी राजनहिरे (वर्ग ७), ऋतुजा आशीष चौधरी (वर्ग १०), चांदणी इंदरशहा सिडाम (वर्ग ९), स्नेहा नरेंद्र गायकवाड (वर्ग ७), मोनाली अनिल धुर्वे (वर्ग ७), सरवरी केशव दोडके (वर्ग १०), शिवाणी अंकोष चौधरी (वर्ग ८), अंजली उमेश फरंदे (वय 10) आदी नऊ विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काल मंगळवारी दिवसभर त्यांचेवर उपचार केल्यानंतर सात जणांना सुटी देण्यात आली. तर अद्यापही दोघांवर उपचार सुरू आहे.
सदर घटनेची माहिती पालकांना होताच काल पासून पालक जांभूळघाट येथे येत आहेत. पालकांनी सुमारे शंभरावर पाल्यांना सुटी काढून घरी नेल्याची माहिती समोर आली येत आहे. पहांदीपारी कृपाल लिंगो आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष भाऊजी टेकाम यांनी, या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली असता विद्यार्थ्यांना शिळे अन्न दिल्याची बाबत समोर आली आहे. तसेच या परिसरात असलेल्या विहीर आणि बोअरवेलचे पाणी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी वापरले जात आहे. परंतु ते पाणी योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिळे अन्न किंवा पिण्याच्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना विविध आजाराची लागण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी भाऊजी टेकाम यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना त्रास व्हायला लागल्याने त्यांच्या डेंगू, मलेरिया, कोविड, टायफॉइडच्या तपासण्या करण्यात आल्या,परंतु त्या निगेटिव्ह आल्या आहेत. सध्या सर्वांची प्रकृती सुधारत आहे.
- प्रविण लाटकर, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी, चिमूर
रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवाल येणे बाकी आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा व्हायरल इन्फेक्शनचा प्रकार असू शकतो. दूषित पाणी किंवा शिळे अन्नामुळे हा प्रकार झाला असावा.
- डॉ. अश्विन अगडे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, चिमूर