अनामिक कुष्ठरोग्यांचे स्मारक व्हावे ही इच्छा : डॉ. विकास आमटे

अनामिक कुष्ठरोग्यांचे स्मारक व्हावे ही इच्छा : डॉ. विकास आमटे
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चौदा रुपये व सहा कुष्ठरोगींना घेऊन बाबा आमटे यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. समितीमार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी येथील कुष्ठरुग्णांनी प्रचंड त्याग केला. कुष्ठरोगी लढाई हारलेले पण युद्ध जिंकलेले सैनिक आहेत. आनंदवनात अनाम मूक कळ्यांची व अनाम वृक्षांची स्मरणशीला बनविण्यात आलेली आहे. आनंदवनात अनामिक कुष्ठरोग्यांचीही स्मरणशीला असावी, अशी माझी इच्छा असून त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. आनंदवन निर्मितीच्या वेळी खोदकामात निघालेले, विविध ठिकाणांहून आणलेले तसेच कलात्मक दृष्टीने एकत्रित केलेले पुरातन मोठ – मोठे दगड संग्रहित केले असून त्याच्या सहाय्याने लवकरच अनामिक कुष्ठरोग्यांचे स्मारक बनविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन डॉ. विकास आमटे यांनी केले.

बाबा आमटे यांच्या १६ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन वरोरा येथील आनंदवनातील श्रध्दावनात करण्यात आले होते. त्यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी सीतारमण हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक  डॉ.विजय पोळ, समितीचे विश्वस्त सदाशिवराव ताजने, सुधाकर कडू , माधव कवीश्वर, आनंदवन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, दिनेश पारेख, जयंत आमटे, शकील पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना डॉ. आमटे म्हणाले, सुरूवातीच्या काळात कुष्ठरोग्यांच्या रुपात जिवंत प्रेत बघून बाबा पळून गेले होते. त्यात त्यांना आपला पराभव जाणवला. नंतर पराभवावर विजय मिळविण्यासाठी बाबा पुढे सरसावले. बाबांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. त्यांनी आपलं चरित्र लिहिलं नाही. मागे वळून पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. त्यांनी आनंदवनात स्मारक उभारु दिले नाही.  बाबा आमटे आम्हाला समजायला अनेक वर्ष लागले, असे ते यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, एक साधा पेन चोरणाऱ्यावर " चोर " हा शिक्का लागतो पण हजारों कोटी रुपये बूडवून पळणारे मात्र मोकळे. त्याचप्रमाणे अनेक रोगाबद्दलची मुद्रा पुसली जाते परंतु कुष्ठरोगाची नाही. अनेक कायदे कुष्ठरुग्णांच्या विकासासाठी अडचणींचे ठरत असून त्यांच्या या न्याय हक्कासाठी समाजाने पुढे येण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमात शिरीष आमटे, दीपा मुठाड, डॉ. कृष्णा कुलधर,आनंदवनाचे कार्यकर्ते दीपक शीव, प्रल्हाद ठक, कुळसंगे, विजय पिलेवान, शौकत खान, आनंदवन मित्र मंडळाचे सचिव राजेंद्र मर्दाने, डॉ.प्रवीण मुधोळकर, राहुल देवडे, शाम ठेंगडी, छोटुभाई शेख उपस्थित होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news