Chandrapur News | विद्यार्थ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी नागभीड – सोनापूर मार्गावर बस सुरु करण्याची मागणी

माजी उपसरपंच प्रदीप समर्थ यांची मागणी, बसअभावी चिंधीचकपासून पाच किलोमीटर पायी प्रवास; वन्य प्राण्यांची भीती
 Nagbhid Sonapur Bus Route
Nagbhid Sonapur Bus RoutePudahri
Published on
Updated on

Nagbhid Sonapur Bus Route

चंद्रपूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज नागभीड शहरात ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळी मानव विकास मिशनची बस उपलब्ध असली तरी शाळा सुटल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी बस नसल्याने विद्यार्थ्यांना चिंधीचकपासून सुमारे पाच किलोमीटर पायी चालावे लागत आहे. त्यामुळे नागभीड येथून सकाळी साडेअकरा वाजता सोनापूर मार्गे मानव विकास मिशनची बस सुरू करण्याची मागणी माजी उपसरपंच प्रदीप समर्थ यांनी ब्रह्मपुरी आगार प्रमुखांकडे केली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ व्हावे, या उद्देशाने मानव विकास मिशन अंतर्गत नागभीड–सोनापूर मार्गावर सकाळी सहा वाजता बस सुरू करण्यात आली आहे. ही बस चिंधीचक, चिंधीमाल किटाळी(बोरमाळा), हुमा, मंगरुड, गोविंदपूर, सोनापूर आदी गावांतील विद्यार्थ्यांना घेऊन सकाळी सातच्या सुमारास नागभीड येथे पोहोचवते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोहोचणे शक्य होते.

 Nagbhid Sonapur Bus Route
Heavy rainfall Chandrapur: जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार; वर्धा नदीला पूर, भोयेगाव–चंद्रपूर मार्ग बंद

मात्र, शाळा सकाळी अकरा वाजता सुटल्यानंतर या मार्गावर परतीसाठी कोणतीही मानव विकास मिशन बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना इतर एसटी बसने चिंधीचकपर्यंत यावे लागते. त्यानंतर पुढील गावांमध्ये जाण्यासाठी वाहन उपलब्ध न झाल्यास तब्बल पाच किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर बनते. रस्त्यांवर पाणी, चिखल आणि वाहतुकीचा धोका यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या मार्गाने वाघांची भ्रमंती असल्याने विद्यार्थ्यांचे जीवितास धोका निर्माण झाला आहे. परिणामी पालकांनाही मुले सुरक्षितपणे घरी पोहोचेपर्यंत सतत चिंता लागून राहते.

या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सकाळी विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जशी बस सोडली जाते, त्याचप्रमाणे नागभीड येथून सकाळी साडेअकरा वाजता चिंधीचक, किटाळी मार्गे सोनापूर  मानव विकास मिशनची बस सुरू करावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थी, पालक आणि माजी उपसरपंच प्रदीप समर्थ यांनी केली आहे.

 Nagbhid Sonapur Bus Route
Chandrapur Student Death | गाय चारण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा वीज कोसळून मृत्यू

यासंदर्भात प्रदीप समर्थ यांनी, ब्रह्मपुरी आगार प्रमुखांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या अडचणींची माहिती दिली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शिक्षणाचा विचार करून तातडीने अतिरिक्त फेरी सुरू करण्याची मागणी केली. परंतु अद्याप बस सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये रोष दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी परिवहन विभागाने सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर मानव विकास मिशन ची बससेवा परतीच्या प्रवासासाठी  सुरू करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक आणि पालकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news