

Chimur Student Dies In Lightning
चंद्रपूर : मुसळधार पावसाच्या संभाव्य धोक्यामुळे गुरुवारी (दि.३०) शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे घरची गाय चारण्यासाठी शेतात गेलेल्या चिमूर तालुक्यातील गदगाव येथील महाविद्यालयीन विद्यार्थी सुहास जयेंद्रथ काळे (वय १९) याचा अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाला. या घटनेने गदगावसह परिसरात शोककळा पसरली आहे.
सुहास काळे हा चिमूर येथील ग्रामगीता महाविद्यालयात प्रथम बी.ए. वर्षात शिक्षण घेत होता. गुरुवारी सकाळी सुमारे ११ वाजता तो स्वतःच्या शेतात गाय चारण्यासाठी गेला होता. दुपारी पाऊस सुरू झाल्याने तो बचावासाठी झाडाखाली उभा होता. त्याचवेळी गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील शेतात अचानक वीज कोसळली. विजेचा तीव्र फटका बसल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.