

Cyclist tragically dies after touching electric wire
चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
शहरातील आकाशवाणी केंद्रापासून जगन्नाथ बाबा नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर (रविवार) सायंकाळी वादळामुळे विद्युत तारे जमिनीवर पडली होती. या तारेला स्पर्श होऊन या मार्गाने जाणाऱ्या सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रभाकर गणपत क्षीरसागर (वय 60) रा.दाताळा असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, चंद्रपूर शहरातील जगन्नाथ बाबा नगर येथील ए 65 क्रमांकाच्या खांबावरून उच्च दाबाची 11 केव्ही विजेची तार गेली आहे. रविवार सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या ठिकाणी शॉर्टसर्किट सारखा आवाज होऊन 11 केव्हीची तार तुटून रस्त्यावर पडली. काही स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीला याची माहिती दिली. परंतु तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा बंद केला नाही.
प्रवाहित विद्ययुत तार तशीच पडून होती. या दरम्यान जनता महाविद्यालयात कंत्राटी तत्वावर सुरक्षा रक्षक असलेले दाताळा येथील रहिवासी प्रभाकर गणपत क्षीरसागर सायकलने त्यावेळी ड्युटीवर चालले होते. रस्त्याने जात असताना सायकलच्या चाकात विजेची तार अडकून ते पडले व तारेला स्पर्श झाला. यामध्ये त्यांना विद्युयत शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. देशमुख यांनी रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा तसेच रामनगर वीज वितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता कुणाल पाटील यांना घटनास्थळी पाचारण केले.
यावेळी मृतकांचे कुटुंबीय तसेच दाताळा व जगन्नाथबाबा नगरमधील रहिवाशांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. नुकसान भरपाईचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका उपस्थित नागरिक व मृतकाच्या कुटुंबीयांनी घेतली. अखेर सहाय्यक अभियंता पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला. मृतकाच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे.