

Yehova Yireh Credit Society Financial Fraud
चंद्रपूर : आकर्षक व्याजदर आणि अल्पावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून चंद्रपुरातील येहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने तब्बल १,३३१ गुंतवणूकदारांची ८ कोटी ५९ लाख ९५ हजार ८३८ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात सोसायटीच्या नऊ संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची स्थापना २३ ऑक्टोबर २०२३ रोजी चंद्रपूर येथे करण्यात आली होती. सोसायटीच्या संचालकांनी स्थानिक एजंट, व्यवस्थापक आणि अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून नागरिकांना विविध आकर्षक गुंतवणूक योजनांची माहिती दिली. जादा व्याज आणि निश्चित परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारण्यात आल्या.
सोसायटीकडून बचत खात्यावर वार्षिक ४ टक्के, तर मुदत ठेवींवर ९.७५ टक्के व्याज देण्याचे आश्वासन दिले जात होते. टीडीएस टाईम डिपॉझिट योजनेअंतर्गत दरमहा १ हजार ३९९ रुपये याप्रमाणे २२ महिने भरल्यास २४ व्या महिन्यात ८४ हजार १७४ रुपये मिळतील, असे सांगण्यात आले होते. तसेच एकरकमी ६८ हजार रुपये गुंतविल्यास दोन वर्षांनंतर ८४ हजार १७४ रुपये परत मिळतील, असेही आमिष दाखविण्यात आले होते.
याशिवाय युवा बचत धन योजना, बचत धन योजना आणि मासिक उत्पन्न योजना अशा विविध योजनांद्वारे गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून अनेक नागरिकांनी सोसायटीत पैसे गुंतविले.
या प्रकरणातील फिर्यादी चंद्रकिशोर नामदेव मांडवकर (वय ५२, रा. आनंदवन चौक, द्वारकानगरी, बोर्डा, ता. वरोरा) यांनी ८४ हजार १७४ रुपये गुंतविले होते. त्यांच्यासह अन्य १ हजार ३३१ गुंतवणूकदारांकडून एकूण ८ कोटी ५९ लाख ९५ हजार ८३८ रुपये जमा करण्यात आले. यामध्ये फिर्यादीच्या रकमेव्यतिरिक्त अन्य गुंतवणूकदारांचे ८ कोटी ५१ लाख ११ हजार ६६४ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मात्र, ठरल्याप्रमाणे गुंतवणुकीचा परतावा न देता संचालकांनी गुंतवणूकदारांच्या पैशांची अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सोसायटीचे संचालक अपेक्षा स्नेहदीप जोब, अतुल सोपान बनसोड, दुर्गा गौरंग मंडल, वैशाली मधुकर बुच्चे, पल्लवी ऋषी वासेकर, तेजस्विनी अतित्या लोखंडे, प्रीती विनोद भिलकर, वैभव गुरुदेव चौधरी आणि विकास देवराव दुधबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. ११७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(५), ३१६(२), ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, १९९९ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर करीत आहे.
फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांच्या ठेवींच्या रकमेच्या याद्या तयार करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. ज्या गुंतवणूकदारांना अद्याप त्यांची गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळालेली नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
यासाठी गुंतवणूक प्रमाणपत्र, पैसे जमा केल्याच्या पावत्या, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच ज्या राष्ट्रीयीकृत बँक खात्यात परताव्याची रक्कम जमा व्हावी, त्या खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासनाच्या २५ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या परिपत्रकानुसार गुंतवणूकदारांनी परिशिष्ट-१ मधील विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा. यासाठी आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस ठाणे दुर्गापूर परिसर, पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.