चंद्रपूर : महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात वरोरा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ (२) (एन) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय विविध कलमांखाली कारावास आणि एकूण ११ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायालयाने हा निकाल दिला.
दिनांक २९ एप्रिल २०२१ रोजी फिर्यादी महिला आरोपीसोबत चारचाकी वाहनाने आपल्या वाढवणा या गावाकडे जात होती. खैरी येथून वाढवणा येथे जाण्याऐवजी आरोपीने वाहन माढेळी मार्गावर वळवून नागरी-माढेळी परिसरातील निर्जन ठिकाणी नेले. तेथून सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आरोपीने महिलेला धमकावून मारहाण केली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
या तक्रारीवरून वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५३/२०२१ अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३२३ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक करून प्रकरणाचा सखोल तपास केला. या प्रकरणाचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी केला. तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे संकलित करण्यात आले. त्यानंतर न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
वरोरा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अतुल के. शहा यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. गोविंद उराडे यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला कलम ३७६ (२) (एन) अन्वये जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास तीन महिन्यांचा साधा कारावास. कलम ३७६ अन्वये सात वर्षांचा कारावास आणि ४ हजार रुपये दंड. कलम ३२३ अन्वये एक वर्षाचा कारावास आणि १ हजार रुपये दंड. कलम ५०६ अन्वये एक वर्षाचा कारावास आणि १ हजार रुपये दंड.
या प्रकरणात महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. सरकारी अभियोक्ता अॅड. गोविंद उराडे यांनी न्यायालयात सरकार पक्षाची बाजू मांडली, तर सहाय्यक फौजदार धनराज करकाडे (ब.नं. २०४०), पोलीस ठाणे वरोरा यांनी न्यायालयीन पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.