

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा
चंद्रपूर शहरात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Chandrapur water crisis) शहरातील अनेक भागांमध्ये नियमित नळपाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने महानगरपालिकेला दररोज ८० ते १०० टँकर रस्त्यावर उतरवावे लागत आहेत. मात्र टँकरचे पाणीही वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील वाढत्या तापमानामुळे पाण्याची मागणी वाढली असून अनेक भागांतील बोअरवेल आटल्या आहेत. काही ठिकाणी जलस्रोतांची पातळी खालावल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. परिणामी अनेक प्रभागांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली आहे.
पाणीटंचाईच्या झळा सर्वाधिक महिलांना सहन कराव्या लागत आहेत. अनेक महिलांनी संताप व्यक्त करत सांगितले की, नियमितपणे नळाचे बिल भरूनही तीन ते चार दिवस नळांना पाणी येत नाही. टँकरची मागणी केल्यानंतरही दोन-तीन दिवस प्रतिसाद मिळत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागते. घरात लहान मुले असताना पिण्याचे व वापराचे पाणी मिळवणे अत्यंत कठीण झाले आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील अनेक भागांत दोन ते तीन दिवसांनंतरच पाणीपुरवठा होत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीत १९ प्रभाग असून ६६ नगरसेवक प्रतिनिधित्व करतात. मात्र एवढ्या मोठ्या शहरासाठी उपलब्ध असलेली टँकर व्यवस्था अपुरी पडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
विशेषतः प्रभाग क्रमांक ७ अंतर्गत जटपुरा गेट परिसरात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र असल्याचे सांगितले जात आहे. या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र टँकरचे पाणीही वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. शहरात गंभीर पाणीटंचाई असताना त्यावर अपेक्षित उपाययोजना होताना दिसत नाहीत. ज्या भागांमध्ये पाण्याची समस्या अधिक आहे, त्या भागांत टँकरद्वारे नियमित आणि वेळेवर पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. महानगरपालिका प्रशासनाने स्वतंत्र बैठक घेऊन सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधत शहरातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.