

नेवासा: नेवासा शहरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामागे 35 वर्षांपूर्वीची कालबाह्य झालेली पाणीपुरवठा योजना आणि मोठ्या प्रमाणातील बेकायदेशीर नळजोडण्या हे प्रमुख कारण ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे पाणीयोजनेचा उगम असलेल्या प्रवरासंगम गोदावरी पात्र तसेच शहरालगतच्या प्रवरेच्या मधमेश्वर बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही नागरिकांना आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
सन 1990 च्या दशकात सुरू झालेली ही पाणीपुरवठा योजना तत्कालीन लोकसंख्येचा विचार करून उभारण्यात आली होती. मात्र, गेल्या तीन दशकांत शहराची लोकसंख्या आणि विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला असून, विद्यमान योजना आता पूर्णतः अपुरी ठरत आहे. या योजनेचा कार्यकाल 2022 मध्येच संपुष्टात आला असला तरी अद्याप त्याच जीर्ण यंत्रणेवर शहराचा पाणीपुरवठा सुरू आहे.
सध्या नेवासा शहरात सुमारे आठ हजार घरे असताना अधिकृत नळजोडण्या केवळ तीन हजारांच्या आसपास आहेत. उर्वरित चार हजारांहून अधिक जोडण्या या बेकायदेशीर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिणामी मुख्य जलवाहिन्यांवर प्रचंड ताण निर्माण झाला असून, अनेक ठिकाणी पाईपलाईन अक्षरशः चाळणीसारखी झाली आहे.
या योजनेतून प्रतितास सुमारे दीड लाख लिटर पाण्याचा उपसा साखळी पद्धतीने केला जातो. हा उपसा 24 तास अखंड सुरू राहिला, तर शहराला दररोज अंदाजे 15 लाख 75 हजार लिटर पाणीपुरवठा करणे शक्य आहे. मात्र, जुनी व गळकी पाईपलाईन, अनधिकृत कनेक्शनमुळे झालेली भगदाडे, वारंवार होणाऱ्या गळती आणि पाईप फुटी यामुळे प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्यामुळे नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे प्रशासनास कठीण बनले आहे.
शहरातील काही भागांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर आहे. एका भागात अवघ्या अडीच इंची जलवाहिनीवर तब्बल 250 नळजोडण्या असल्याने त्या परिसरात पुरेशा दाबाने पाणी पोहोचणे अशक्यप्राय झाले आहे. परिणामी अनेक नागरिकांना पाण्यासाठी दिवसंदिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.
पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नगरपंचायतीला वारंवार दुरुस्ती करावी लागत असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ आणि निधी खर्च होत आहे. त्यातच महावितरणकडून होणारे वारंवार वीज शटडाऊन हे आणखी एक मोठे संकट ठरत आहे. त्यामुळे प्रशासनही या समस्येमुळे हैराण झाले आहे.
नेवासा शहरासाठी मुळा इरिगेशन कॉलनी येथे सहा लाख लिटर क्षमतेची, ज्ञानोदय हायस्कूलमागे चार लाख लिटर क्षमतेची, तसेच ज्ञानेश्वर मंदिर परिसरात दोन लाख लिटर क्षमतेची अशा तीन पाणीसाठवण टाक्या उपलब्ध आहेत. पाणीसाठवण क्षमतेच्या दृष्टीने या टाक्या पुरेशा वाटत असल्या तरी वितरण यंत्रणा अत्यंत जीर्ण झाल्याने शहराच्या सर्व भागात योग्य दाबाने पाणीपुरवठा होऊ शकत नाही.
गोदावरी आणि प्रवरा नद्यांचे पाणी उशाशी असतानाही नेवासकरांना तहानलेले राहावे लागत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. वर्षातील शंभर दिवससुद्धा नियमित पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरणाऱ्या नगरपंचायतीने नागरिकांकडून आकारण्यात येणारी पाणीपट्टी कमी करावी, अशी मागणी वेळोवेळी होत आहे. मात्र, प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
दरम्यान, शहरासाठी नवीन व सक्षम पाणीपुरवठा योजना तातडीने मंजूर करून जुन्या पाईपलाईनचे संपूर्ण जाळे बदलणे, बेकायदेशीर नळजोडण्यांवर कारवाई करणे आणि गळती रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा येत्या काळात नेवाशातील पाणीप्रश्न आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
नवीन पाणीयोजना राबविणार ः घुले
नेवाशाच्या पाणीसमस्येवर नवीन पाणीपुरवठा योजना हेच एक उत्तर आहे. या नवीन पाणी योजनेमध्ये वालमन फ्री व पाण्याच्या मीटरसह प्रत्येक घराला कनेक्शन दिले तर पाणी योजने वरील बोगस कनेक्शन चा प्रश्न मिटेल व पाणीपुरवठाही चांगल्या पद्धतीने होईल, असे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी सांगितले.