

Warora wedding dispute
चंद्रपूर : लग्न म्हणजे दोन कुटुंबांचा सन्मान, समजूतदारपणा आणि परस्पर आदर यांचा संगम मानला जातो. मात्र वरोरा शहरात मानपान व सन्मानाच्या मुद्द्यावरून ऐन विवाहवेळीच लग्न मोडल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकारामुळे संपूर्ण शहरात चर्चेला उधाण आले आहे.
वरोरा येथील वर व कळमेश्वर तालुक्यातील वधू यांचा विवाह रितीरिवाजाप्रमाणे ठरला होता. ठरलेल्या तारखेनुसार शुक्रवारी (दि. १२) सकाळी १२ वाजता वरोरा येथील एका अलिशान मंगल कार्यालयात विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार वधूकडील शुक्रवारला पहाटे सुमारे ५ वाजता मंगल कार्यालयात दाखल झाले. मात्र तेथे त्यांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले. वराकडील कोणतीही व्यक्ती उपस्थित नसल्याने वधूकडील मंडळींची साधी चौकशी अथवा आदरातिथ्यही करण्यात आले नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकांनी तात्पुरत्या स्वरूपात खोल्या उपलब्ध करून दिल्या, मात्र सकाळच्या चहा–नाश्त्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. दरम्यान, ठरलेल्या संख्येपेक्षा वधूकडील सुमारे २० पाहुणे अधिक आल्याने त्यासाठी वराकडील मंडळींनी अतिरिक्त २० हजार रुपयांची मागणी केल्याचे सांगण्यात आले. वधूकडील नातेवाईकांनी हे पैसे फोनपेच्या माध्यमातून दिले, मात्र यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वादाला तोंड फुटले.
लग्नाची वेळ जवळ येत असताना नवरीने सर्व तयारी केली होती, तर नवरदेवही वाजत-गाजत वरात घेऊन मंगल कार्यालयाकडे निघाला होता. मात्र “एवढ्या लांबून मुलगी देण्यासाठी आलो असताना आमचा योग्य सन्मान होत नाही,” अशी भावना वधूकडील मंडळींमध्ये तीव्र झाली. याचदरम्यान वराच्या नातेवाईकाने “लग्न लागल्यानंतर बघून घेऊ,” असे शब्द उच्चारल्याचा आरोप झाल्याने वाद अधिकच चिघळला.
या परिस्थितीत, लग्नाआधीच अशी वागणूक मिळत असेल तर पुढील आयुष्यात मुलीला त्रास सहन करावा लागू शकतो, असा विचार करत वधूकडील मंडळींनी लग्न न करण्याचा ठाम निर्णय घेतला. वराने नवरीला एकांतात समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकण्यास तयार झाली नाही. अखेर वधूकडील मंडळी वरोरा पोलीस ठाण्यात पोहोचली. त्यांना समजावण्यासाठी वराकडील मंडळीही तेथे आली. दोन्ही बाजूंनी आपली भूमिका मांडली, मात्र वधूकडील मंडळींनी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल न करता लग्न मोडण्याचा निर्णय कायम ठेवत वराडासह परतण्याचा निर्णय घेतला.
वर व वधू हे दोघेही उच्चशिक्षित असून पुणे येथे नोकरी करत होते. ऐन लग्न मंडपात विवाह मोडल्याची ही घटना वरोरा शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. यापूर्वीही या वराचे लग्न सगाईनंतर तुटल्याची चर्चा आहे. दरम्यान, लग्न तुटल्यानंतर नवरदेव भावूक अवस्थेत पोलीस ठाण्याच्या आवारात दिसून आला आणि नंतर तो आपल्या घरी परतला.