चंद्रपूर : कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये नवीन मराठी, इंग्रजी आणि हिंदी विषयाचे नवीन कोर्स सुरू करण्यासाठी माध्यामिक शिक्षण विभागाच्या दोन विस्तार अधिकारी व एका सेवानिवृत्त ज्येष्ठ सहायकास ५० हजाराची लाच घेताना लाचलुचपतने अटक केली. विस्तार अधिकारी सावन चालखुरे, लघुत्तम राठोड, तर सेवानिवृत्त जेष्ठ सहायक महेश्वर फुलझेले अशी लाचखोर आरोपींची नावे आहेत. या कारवाईने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी स्वत :च्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी विषयाचे नवीन कॉम्प्युटर कोर्स सुरू करायचा होता. त्यामुळे त्यांनी मान्यता मिळविण्याकरीता कोर्स संबंधित कागदपत्रासह जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये अर्ज सादर केला होता. त्यानंतर तक्रारदार शिक्षण विभाग (माध्यमिक) मधील विस्तार अधिकारी सावन चालखुरे, विस्तार अधिकारी लघुत्तम राठोड यांना भेटले. प्रस्ताव शासनास सादर करण्याकरिता शिक्षणाधिकारी मॅडम यांना पैसे दयावे लागतात. त्याशिवाय काम होणार नाही, म्हणून तक्रारदारकडून ७० हजाराची लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांना पैसे द्यायचे नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत विभागाकडे ३१ जुलै २०२४ ला तक्रार नोंदविली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत विभागाने या प्रकरणासंदर्भात पडताळणी केली. कारवाई दरम्यान दोन्ही आरोपींनी तक्रारदार यांचा प्रस्ताव शासनास मंजुरीकरीता पाठविण्यासाठी ७० हजाराची लाचेच्या रकमेची मागणी केली. तडजोडीअंती ५० हजाराची लाच देण्याचे ठरले. शुक्रवारी दोन शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांसह एका सेवानिवृत्त ज्येष्ठ सहाय्यकास लाचलुचपतने सापळा रचून ताब्यात घेतले.
ही लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, सफौ रमेश दुपारे, पोहवा अरूण हटवार, पोहवा नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, हिवराज नेवारे, पोशि वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदिप ताडाम, राकेश जांभुळकर, म.पो.शि. मेघा मोहुर्ले, पुष्पा काचोळे, चापोशि सतिश सिडाम यांच्या पथकाने हि कारवाई केली. शिक्षण विभागातील दोन शिक्षण विस्तार अधिकारी व एका सेवानिवृत्त ज्येष्ठ सहायकास अटक केल्याने जि.प.मध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.