

चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील कुडेसावली परिसरात वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृत शेतकऱ्याचे नाव घनश्याम गोविंदा उंदिरवाडे (वय 52) असे असून, सोमवारी (दि. 11) सकाळी शेतातील काम आटोपून घराकडे परत येत असताना हा हल्ला झाला. आज सदर शेतकऱ्याचा मृतदेह मिळाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, काल सोमवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घनश्याम उंदिरवाडे शेतावर गेले होते. शेतातील काम पूर्ण करून परत येत असताना शेतालगतच्या झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. हल्ला एवढा भीषण होता की मृताचे मुंडके धडापासून वेगळे झाले होते.
सायंकाळपर्यंत घरी न आल्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी शोधासाठी शेत व जंगल परिसरात पाहणी केली. परंतु ते आढळून आले नाही. अखेर आज मंगळवारी (दि. 12) सकाळी 8 वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह जंगलातील झुडपात आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ब्रह्मपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतकाच्या परिवारास वनविभागाच्या वतीने तातडीने 25 हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. यावेळी आर. एफ. ओ. आकाश सोंडवले यांच्यासह इतर अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
या घटनेमुळे कुडेसावली व परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन्यजीवांच्या हल्ल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.