

Shepherd Injured Tiger Attack Sawli Taluka
चंद्रपूर : सावली तालुक्यातील उपरी बिट अंतर्गत येणाऱ्या राखीव वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक २९७, चक पेठगांव (गव्हारला) येथे आज (दि. ४) सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत मुखरू यादव गेडेकर नामक गुराखी वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.
मुखरू गेडेकर हे दररोजच्या प्रमाणे आपल्या जनावरांना चारण्यासाठी जंगलालगत असलेल्या शेतीजवळ गेले असताना अचानक वाघाने हल्ला चढवून त्यांना जबर जखमी केले. ही घटना समजताच सावली वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, क्षेत्र सहाय्यक राखुंडे (व्याहाड खुर्द), तसेच अन्य वनकर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. वनविभागाच्या पथकाने मौका पंचनामा करून जखमी इसमास शासकीय वाहनाने गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात तातडीने उपचाराकरिता रवाना केले.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्य प्राणी व मानवी वस्तीतील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. विशेषतः शेती हंगाम सुरू असल्यामुळे अनेक शेतकरी आपल्या शेतीलगत जनावरे चारण्यासाठी जंगललगत जात असतात. त्यामुळे अशा घटनांचा धोका सतत निर्माण होत असतो.
सावली तालुक्यातील बहुतांश शेतजमिनी या जंगलाला लागून आहेत. त्यामुळे शेतकरी शेतीकाम करत असतानाच त्यांच्या गुरांची राखण करण्यासाठी जंगल लगत जातात. मात्र, जंगलात दबा धरून बसलेल्या वाघासारख्या शिकारी प्राण्यांपासून धोका कायमच असतो. मुखरू गेडेकर यांच्यावरही हेच संकट कोसळले.
वन विभागाने सदर घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ कार्यवाही केली असली तरी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. “जंगलात वावरणाऱ्या वाघांचा धोका आता शिवारात वाढत चालला आहे. शेतीकाम करत असताना आम्हाला आपला जीव मुठीत धरावा लागतो,” असे मत काही ग्रामस्थांनी व्यक्त केले.
वन विभागाकडून सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून संभाव्य धोका लक्षात घेता गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच, संबंधित वाघाला पिंजऱ्यात पकडण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या प्रकारामुळे वन्यजीव संवर्धन आणि मानवी हक्क यामध्ये संतुलन राखण्याचे आव्हान अधिकच कठीण बनले आहे.
शासनाने अशा घटनांचा पुनरावृत्ती टाळण्यासाठीवाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, जंगलालगतच्या शिवारात वनविभागाची गस्त वाढवावी, जनावरांची चराई राखीव जंगलाऐवजी नियोजित कुरणात करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, जखमी गुराखीस आर्थिक मदत व योग्य वैद्यकीय सुविधा मिळवून द्यावी अशा मागणी केली आहे.